Crime News Live Updates
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच साताऱ्यात चारित्र्याचा सतत संशय घेणाऱ्या पतीने पत्नीशी भांडण करून तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. ही घटना मंगळवार पेठ येथील रवी रिजन्सी येथे उघडकीस आली. याप्रकरणी मेहुणा श्रेयस अनिल कुमार पाटील (वय २०, मेहर देशमुख कॉलनी करंजे) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. आरोपी राजेंद्र भानुदास शिंदे (वय ३२, रा. मंगळवार पेठ, मूळ राहणार पानमळेवाडी पोस्ट, वर्ये तालुका, सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंजली राजेंद्र शिंदे (वय २९, रा मंगळवार पेठ) असे मृत महिलेचे नाव आहे.
24 Jun 2025 04:48 PM (IST)
वाल्मिक कराडने युक्तिवाद करत असतांना आपला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात आपला हात नसल्याचे सांगत, या प्रकरणी मकाको लागत नाही. असं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचा या युक्तिवादाला आम्ही जोरदार विरोध केला. सोबतच न्यायालयाला हे स्पष्ट करून सांगितलं की, आरोपी विरोधात काय काय पुरावे आहे. त्या संपूर्ण पुराव्यांची जंत्री आम्ही न्यायालयासमोर सादर केली. त्याच प्रमाणे कटाचा मुख्य सूत्रधार कायम पडद्यामागे असतो आणि आपल्या कटपूतल्यांचे आधारे तो वाईट कृत्य करत असतो. मात्र या प्रयत्न आपण हाणून पाडला आहे. अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज (24 जून) बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या सुनावणीवर भाष्य करत प्रतिक्रिया दिली.
24 Jun 2025 02:55 PM (IST)
राज्य परिवहन महामंडळानं मोठा निर्णय घेतला आहे. आता एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस कुठपर्यंत पोहोचली हे समजणार आहे. एसटी बसचे लाईव्ह लोकेशन समजण्यासाठी अॅप येत्या 15 ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहे. यासंदर्भातील माहिती राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
24 Jun 2025 02:45 PM (IST)
कात्रज भागात ज्येष्ठ महिलेला बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना घडली. याबाबत ७४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,तक्रारदार कात्रज येथील शिवशंभोनगर भागात राहतात. त्या सोमवारी (२३ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांना थांबवून या भागात महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी बतावणी केली. त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटा ५५ हजारांची सोन्याची माळ लांबवून पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.
24 Jun 2025 02:42 PM (IST)
देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला येरवडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोनकाडतुसे जप्त करण्यात आली. सोपान सावंत उर्फ सोप्या सरकार (वय २३, रा. गांधनखिळा वस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शाखाली ही कारवाई करण्यात आली.
24 Jun 2025 02:26 PM (IST)
वडगाव बुद्रुक परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दीपाली प्रसाद गुरव (वय ३४, रा. सद्गुरुकृपा बिल्डींग, रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 Jun 2025 02:18 PM (IST)
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे सावकारीच्या वादातून एका तरुणाचा कोयत्याने वार करून भरचौकात खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.23) मेरा खुर्द फाटा येथे दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भरत विर्शिद (वय 40, रा. नांद्राकोळी, ता. जि. बुलढाणा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
24 Jun 2025 01:03 PM (IST)
पुणे-सोलापूर रस्त्यावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या दोन भाविकांचे मोबाईल चोरट्यांनी गर्दीतून पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पालखी सोहळ्यात दोन महिलांचे दागिने लांबविल्याच्याही घटना घडल्या आहेत. पालखी सोहळ्यातील चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. तरीही गर्दीत चोरट्यांनी भाविकांकडील मोबाइल, दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत.
24 Jun 2025 12:35 PM (IST)
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यानं महादेव बाबर नाजार होते… पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का… ठाकरेंच्या शिवसेनेचे महादेव बाबर राष्ट्रवादीत प्रवेश करणार….
24 Jun 2025 12:30 PM (IST)
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापूर येथील सिद्धेश्वर मठात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मठाचे प्रमुख अडवी सिद्धराम स्वामी हे रात्रीच्या वेळी एका महिलेसोबत त्यांच्या खोलीत असल्याचे निदर्शनास आल्यावर गावात खळबळ उडाली. ग्रामस्थांनी ही माहिती मिळताच मोठ्या संख्येने मठाकडे धाव घेतली आणि स्वामीजींना जाब विचारला. संतप्त ग्रामस्थांनी मठातून स्वामींची हकालपट्टी केली. विशेष म्हणजे, ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याने व मोठा गोंधळ उडाल्याने पोलिसांनी देखील मठाच्या घटनास्थळी धाव घेतली होती. सविस्तर बातमी
24 Jun 2025 12:29 PM (IST)
जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पित्यानेच आपल्या मद्यपी मुलाची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना जळगाव येथील कसबा पिंपरी भागात घडला आहे. शुभम सुरडकर (25) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दारुड्या पोराच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या पित्यानेत डोक्यात दगड घालून आपल्या पोराची हत्या केली. त्यानंतर निर्जन रस्त्यावर मृतदेह टाकून दुसऱ्याच कुठल्यातरी व्यक्तीने हत्या केल्याचं बनाव करण्याचा प्रयत्न केला. आरोपी वडिलांचं नाव धनराज सुपडू सुरडकर हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर बातमी
24 Jun 2025 12:28 PM (IST)
पुणे: मोटार पुढे नेण्याच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कोरेगाव पार्क भागातील एका तारांकित हॉटेलसमोर घडली. या प्रकरणी पोलिसांकडून दोन मोटारचालकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सार्वजनिक शांततेचा भंग करणे, मारामारी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
24 Jun 2025 12:16 PM (IST)
राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी आणि पावसाची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सह्याद्री पर्वत रांगेत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
24 Jun 2025 12:00 PM (IST)
कोंढवा बुद्रुक भागातील साईनगर येथील बौद्ध विहारातील दान पेटी फोडून चोरट्यांनी ६० ते ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत ६७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञातावर गुन्हा नोंद केला आहे. साईनगरमध्ये बौद्ध विहार आहे. चोरट्यांनी विहारमधील दान पेटीची कडी तोडून आतील ६० ते ८० हजार रुपयांची रक्कम चोरून नेली आहे.
24 Jun 2025 11:52 AM (IST)
मंगळवारी दक्षिण फिलीपिन्समध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. फिलीपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ ज्वालामुखी आणि भूकंपशास्त्रानुसार, या भूकंपाची तीव्रता ६.४ इतकी नोंदवण्यात आली. काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी ही तीव्रता ६.२ असल्याचेही नमूद केले आहे. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच, त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. फिलीपिन्स हा पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर स्थित असल्याने येथे भूकंपाचे धक्के वारंवार जाणवतात. हे क्षेत्र पृथ्वीवरील सर्वाधिक भूकंपप्रवण भागांपैकी एक मानले जाते.
24 Jun 2025 11:33 AM (IST)
वसईमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वाढदिवसाच्या पार्टीत क्षुल्लक कारणातून वाद झाला. या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकाचे नाव आकाश पवार असे आहे. तर, मनोज पांडे (37 वर्ष) आणि राहुल भुरकुंड (27 वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत.