कोल्हापूरात घराला भीषण आग (फोटो- सोशल मीडिया)
कोल्हापुरात भीषण स्फोट
सुदैवाने जीवितहानी नाही
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील शाहूनगर परिसरातील एका घराला मंगळवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आग लागल्यानंतर काही वेळातच घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आगीने अधिक भयानक रूप धारण केले. आगीचे लोळ संपूर्ण घरभर पसरले. सिलिंडर स्फोटामुळे आगीची तीव्रता वाढल्याने घरातील फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य व इतर वस्तू जळून खाक झाल्या. काही क्षणातच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. दरम्यान, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असून, शॉर्टसर्किट, गॅसगळती किंवा अन्य कारणांमुळे आग लागली का, याचा शोध घेतला जात आहे.
अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अरुंद परिसर आणि सिलिंडर स्फोटामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या. मात्र काही वेळाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
परिसरात काही काळ भीतीचे वातावरण
या घटनेमुळे शाहूनगर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या आवाजात झालेल्या स्फोटामुळे नागरिक घराबाहेर पडले. खबरदारीचा उपाय म्हणून आसपासच्या घरांतील गॅस सिलिंडर दूर करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी गर्दी होऊ नये, यासाठी बंदोबस्त ठेवला होता.
गारगोटी-कडगाव रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा थरार
कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे गारगोटी-कडगाव मुख्य रस्त्यावर सायंकाळी सातच्या सुमारास चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. या आगीत चारचाकी कार पूर्णपणे जळून खाक झाली. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, कारचे यामध्ये मोठे नुकसान झाले.
कोल्हापूरच्या गारगोटी-कडगाव रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा थरार; आगीत कार जळून खाक
नित्तवडे (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय धनाजी तरवडेकर हे आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर येथे गेले होते. कोल्हापूरहून परत येत असताना आकुर्डे येथे पोहोचल्यावर अचानक गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि क्षणाचाही विलंब न करता गाडीत बसलेल्या सर्व कुटुंबीयांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले.






