(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवरील तुझ्या सोबतीने ही मालिका नवीन वर्षात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीकडून काही दिवसांपूर्वीच या मालिकेची लॉन्चिंग डेट अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली होती. 12 जानेवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. मात्र, आता यात एक नवीन अपडेट समोर आली आहे. प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच स्टार प्रवाहने या मालिकेची लॉन्चिंग डेट बदलण्यात आली आहे. या मालिकेचा पहिला भाग 12 जानेवारीऐवजी 19 जानेवारीपासून प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित केली जाईल. याबाबत स्टार प्रवाहकडून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली आहे.
ही नवीन मालिका सुरू झाल्यानंतर स्टार प्रवाहची कोणती मालिका निरोप घेणार? याबद्दल अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. कारण ९ वाजताच्या प्राइम स्लॉटला नशीबवान ही मालिका प्रसारित होत आहे. आता तुझ्या सोबतीने मालिका सुरू झाल्यावर आदिनाथ कोठारेची मुख्य भूमिका असलेली नशीबवान मालिकेची वेळ बदलण्यात येईल का? याबाबत लवकरच माहिली दिली जाईल.
एकीकडे मुंबईतल्या चाळीत राहणारी, कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे पेलणारी आणि तरीही आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहाणारी नुपूर. तिच्या मते सगळेच परिपूर्ण नसतात. जग इमपरफेक्शनच्या तत्वांवर चालतं. तर दुसरीकडे ग्लॅमर, लाईट्स आणि परफेक्शनच्या जगातला सुमती इव्हेंट्सचा मालक मल्हार खानविलकर. नुपूर आणि मल्हारचं जग जरी वेगळं असलं एकमेकांच्या साथीने ते प्रवास कसा करतात याची गोष्ट म्हणजे तुझ्या सोबतीने ही मालिका. एतशा संझगिरी आणि अजिंक्य ननावरे ही नवी जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
याशिवाय ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.






