संग्रहित फोटो
बारामती : माळेगाव पोलिसांनी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या तिघा सराईतांना पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपारची कारवाई केली आहे. तडीपारीची ही कारवाई सुरू झाल्याने सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. कांबळेश्वर (ता. बारामती) या गावातील सुरज पांडुरंग जाधव (वय २५ ), चेतन पांडुरंग जाधव ( वय २४) व अर्जुन बाळासो आडके (वय २२) या तिघांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
माळेगाव पोलीस ठाणे तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात नागरीकांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून नागरीकांना मारहाण करणे, घातक शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे, अशी गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता माळेगाव पोलिसांनी कंबर कसली आहे. या सराईत आरोपींवर कायद्याचा जरब व धाक निर्माण होण्यासाठी आणि भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार अथवा समाजविघातक घटना टाळण्यासाठी तडीपार प्रस्तावाची पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सखोल चौकशी करुन या ३ गुन्हेगारांना संपुर्ण पुणे जिल्हा हद्दीमधून (पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय सह) १ वर्षे कालावधी करीता तडीपार करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांना पुणे जिल्हयातून १ वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.
विविध गुन्हे दाखल
माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील कांबळेश्वर येथील वरील तीन आरोपींवर सर्वसामान्य लोक, शालेय विदयार्थी, शालेय विदयार्थिनी व महीलांची छेडछाड करणे, मजुर व नोकरदार वर्ग यांच्यामध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण करणे असे गंभीर गुन्हे केल्याची माहीती मिळाल्याने या तिघांना १ वर्षासाठी संपुर्ण पुणे जिल्हा हद्दीमधून (पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय सह) तडीपार करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगाव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, प्रतिबंधक कारवाई विभागाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर, जालिंदर बंडगर यांनी केलेली आहे. या कामासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचेकडील सहायक फौजदार महेश बनकर, पोलिस हवालदार रामदास बाबर यांचे सहकार्य लाभलेले आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे- मुंबई महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची टेम्पोला धडक; दोघांचा जागीच मृत्यू