सातारा : अमरावती (Amravati) येथे लव्ह जिहादप्रकरणी (Love Jihad) बेपत्ता तरुणीचा शोध लागला आहे. तिला डांबून ठेवल्याचा आरोप खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केला होता. यावरून त्यांनी अमरावती पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. त्यातच या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. साताऱ्यातून (Satara) एका अनोळखी व्यक्तीने फोन करून या युवतीची माहिती दिली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी (Railway Police) सदर तरुणीला ताब्यात घेतले.
अमरावतीमधून बेपत्ता तरूणी ही सातारा येथून गोवा एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यामुळे सदर एक्सप्रेस काही काळासाठी थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी, तिला ताब्यात घेण्यात आले असून अमरावती पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लीम युवकाने सुशिक्षित हिंदू तरुणीशी लग्न केल्याचा प्रकार खासदार अनिल बोंडे यांनी उघडकीस आणला होता. सदर युवकांने तिला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्टकडून अवैधरित्या लग्न लावून घेतल्याची माहिती समोर आली. या विवाहसंस्थेला परवानगी नसताना बनावट लग्न प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला आहे.