मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money Laudering) सक्रिय सहभाग असल्याचा दावा अंमलबजावणी (ED) संचालनालयाच्यावतीने प्रतिज्ञापत्राद्वारे (Affidavit) करण्यात आला आहे. तसेच, ६ आठवड्यांपेक्षाही जास्त काळ वैद्यकीय कारणास्तव मलिक कारागृहाबाहेर होते. आता त्यांचे कारागृहाबाहेर राहण्याचे कोणतेही स्पष्ट कारण दिसत नसल्याने त्यांना पुन्हा कारागृहात (Jail) पाठण्याची मागणी करत ईडीने मलिकांच्या जामीन अर्जाला विरोध दर्शवला आहे.
‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. याआधीही मलिक यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. प्रत्येकवेळा अर्ज फेटाळण्यात आला. आता मलिक यांनी नव्याने अर्ज दाखल केला असून जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांनी याचिकेत केला आहे. मागील सुनावणीदरम्यान, तपास यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, विशेष सत्र न्यायालयाने ईडीला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ईडीच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.
मलिक यांना विशेष न्यायालयाने मे महिन्यात सहा आठवड्यांसाठी खासगी रुग्णालयात उपचारांची परवानगी दिली होती. मात्र, सहा आठवडे उलटूनही मलिक यांच्यावर होणाऱ्या वैद्यकीय उपचारांबाबत कोणतीही खात्रिशीर माहिती ईडीकडे उपलब्ध नाही, असा दावा ईडीने केला आहे. तसेच, मलिकांच्या जामीन अर्जात कोणत्याही वैद्यकीय पार्श्वभूमीचा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांना उपचारांची गरज नसून त्यांना पुन्हा कारागृहात पाठवावे, अशी मागणी ईडीने केली.