पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले (संग्रहित फोटो)
कोल्हापूर : तक्रादाराकडून सातबारा आणि फेरफार दुरुस्त करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना एकाला रंगेहात पकडण्यात आले. सुरेश जगन्नाथ खोत (वय ४९, रा. भैरेवाडी, ता.शाहुवाडी, जि.कोल्हापूर) असे यामध्ये कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरेश खोत याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून कारवाई केली.
यातील तक्रारदार यांच्या मामे भाऊ आणि त्यांच्यासह हिस्सेदारांनी मौजे सावे येथे जमीन खरेदी केली होती. सदर जमिनीच्या गट नंबरमध्ये खाडाखोड होऊन चुकीच्या गट नंबरची नोंद झाली होती. सदर खाडाखोड करणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून पूर्ववत सातबारा आणि फेरफार दुरुस्त करून मिळण्यासाठी शाहुवाडी येथील तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज केला होता.
सदर अर्जाचा पाठपुरावा यातील तक्रारदार करत होते. या अर्जाची तहसीलदार यांच्याकडे सुनावणी चालू होती. यातील तक्रारदार तहसीलदार कार्यालयात येऊन दिलेल्या अर्जाचे काम कुठंपर्यत आले आहे. हे पाहण्यासाठी संबंधित विभागाकडे गेले. तेव्हा त्या ठिकाणी तक्रारदारांना सुरेश खोत यांची भेट झाली. त्याने तक्रारदाला तुमचे प्रलंबित असलेले काम तहसीलदार यांच्याकडून करून देतो. मात्र, तहसीलदार यांना देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
दरम्यान, लाचलुचपत विभागाने तक्रादाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता सुरेश खोत याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत पथकाने सुरेश खोत याला तक्रारदाराकडून पाच लाख रुपये घेताना रंगेहात पकडून कारवाई केली. सदर सुरेश खोत याच्यावर शाहुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.