फोटो सौजन्य: iStock
संतोष पाटील/पालघर: पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खाजगी अनुदानित आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील एका खाजगी आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
मृत विद्यार्थ्यांची नावे देविदास परशुराम नावळे (इयत्ता दहावी, बीवळपाडा – मोखाडा) आणि मनोज सिताराम वड (इयत्ता नववी, दापटी – मोखाडा) अशी असून, हे दोघेही एकाच शाळेत शिक्षण घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारच्या रात्रीच्या सुमारास हे दोन्ही विद्यार्थी पाण्याच्या टाकीजवळ गेले. तिथे कपडे सुकवण्यासाठी असलेल्या दोरीच्या सहाय्याने त्यांनी झाडाला गळफास घेतला. रात्री अंदाजे दीडच्या सुमारास सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नजरेस ही घटना आली. त्यांनी तत्काळ शाळा प्रशासनाला माहिती दिली आणि नंतर पोलीस ठाण्याला कळविण्यात आले.
Mangal Prabhat Lodha: मुंबईत छट पूजेचा उत्साह; मंत्री लोढा अन् अमित साटम घेणार आढावा
घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीय येण्याआधीच मृतदेह खाली उतरविण्यात आला, यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पालघर लोकसभेचे भाजप खासदार हेमंत सावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे पालकवर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पालकांनी शाळा प्रशासनाच्या उदासीनतेचा आणि देखरेखीतील त्रुटींचा जाब विचारला आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मुख्याध्यापक व अधीक्षकांना निलंबित करण्याची कारवाई सुरू केली असून, या संपूर्ण घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत सावरा यांनी घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, “आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे,” असे सांगितले.
Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनीही प्रशासनाकडून तातडीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी जव्हार-मोखाडा परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या संस्थेच्या आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेतात. त्यामुळे या घटनेने संपूर्ण आदिवासी विभागात भय आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण तयार करण्याची मागणी आता जिल्हाभरातून होत आहे.