लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आला. एवढेच नव्हे; तर महिलेची ७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करून आरोपी पसार झाला. फेब्रुवारी २०२४ मध्ये पीडितेची आरोपी देवराव देवसिंग साबळे (वय ३४, रा. धोणी, पालोदी, ता. मनोरा, जि. वाशिम) याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली. ओळख वाढत गेल्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देत पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने त्याला ६ लाख ५० हजार रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने, क्रेडिट कार्डद्वारे ८० हजार रुपये आणि दुचाकी दिली.
हेदेखील वाचा : Mira Bhayandar Crime : धक्कादायक! 12 वर्षीय मुलीवर 200 जणांकडून लैंगिक अत्याचार, मानवी तस्करीचे क्रूर वास्तव
यानंतर आरोपी सर्व मालमत्ता घेऊन पसार झाला. त्याने पीडितेशी संपर्क तोडला. शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना २४ फेब्रुवारी २०२४ ते २३ जून दरम्यान घडली. अखेर पीडितेने बुधवारी (दि. १३) अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी देवराव साबळेविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि धमकावणे या कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वीच मीरा भाईंदरमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 12 वर्षीय मुलीचे तब्बल 200 हून अधिक नराधमांनी लचके तोडले आहेत. मागील कित्येक महिन्यांपासून पीडित मुलगी अत्याचार सहन करत होती. ती मुलगी मानवी तस्करीच्या एका मोठ्या जाळ्यात अडकली होती. तीन महिन्यांच्या काळात तब्बल 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.