संग्रहित फोटो
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, दरोडे, लुटमार, चोऱ्या यासारख्या घटना घडत असतात. अशातच आता पिंपरीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी शहरातील प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात, बंगल्यात घुसून वृद्ध नागरिकाचे हातपाय बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवत दरोडा टाकणार्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल बाराशे किलोमीटर पाठलाग करत राजस्थानमधून मुख्य आरोपींना अटक केली असून, तिसऱ्या स्थानिक आरोपीला तळेगाव येथून पकडले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे.
निगडी प्राधिकरण येथे १९ जुलै रोजी सायंकाळी एका जेष्ठ नागरिकाच्या बंगल्यात दरोडेखोरांनी घुसखोरी करत वृद्धाचे हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली. त्यानंतर घरातील कपाटे उचकून ६ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम चोरून नेली होती. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. यामध्ये पथकाने सुमारे १२०० किलोमीटर प्रवास केला. तसेच, २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
राजस्थान येथील जयपूरमधून सुरेश लादुराम ढाका (२९, रा. दंतीवास, जि. जलौर, राजस्थान) आणि त्याच्या साथीदारांना शामनगर, जयपूर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार, चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्याशी संबंधित असलेला महिपाल रामलाल बिष्णोई (१९, सध्या रा. वडगाव मावळ) याला तळेगाव येथून अटक केली आहे. त्याच्याकडून फिर्यादीच्या पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या, कानातले, घड्याळ आणि बनावट नंबर प्लेट जप्त केली आहे.
आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद
राजस्थान आणि गुजरात राज्यांत या आरोपींवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आदी २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीत एक महिला आरोपी आणि इतर तीन आरोपींचा तपास सुरू असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. गुन्ह्यानंतर मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी आरोपींनी वॉकी टॉकीचा वापर केला. हे पाच जण स्विफ्ट कारमधून आले. घरात घुसल्यावर एकाने निगराणी ठेवली, एकाने पाळत ठेवली तर उर्वरित आरोपींनी लूट केली. परस्पर संपर्कासाठी त्यांनी मोबाईलऐवजी वॉकी टॉकी वापरले, ही बाब पोलिसांनी तपासात उघड केली आहे. हे उपकरण आणि बनावट नंबर प्लेटसह गाडीही जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. या पथकात दत्तात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, महेश खांडे, सोमनाथ मोरे, गणेश कोकणे, नितीन लोखंडे, अमर कदम, विनोद वीर आदींचा समावेश होता.