देहविक्रीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची धाड (File Photo : Escort Service)
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच एका घरात अमरावती शहर गुन्हे शाखेने धाड टाकत देहव्यापाराचा पर्दाफाश केला. ही घटना शनिवारी (दि.६) वरवाड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका महिला दलालासह ३ तरुणी आणि २ ग्राहक ताब्यात घेतले. कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकताना देहव्यापार चालवणारी मुख्य महिला, तिच्यासोबत कार्यरत ३ तरुणी आणि २ ग्राहकांना ताब्यात घेतले. त्या ठिकाणावरून आक्षेपार्ह साहित्य, मोबाइल फोन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी वलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चौकशीत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी महिलेकडून परिसरात देहविक्री सुरू असल्याचे समोर आले. गुन्हे शाखा या प्रकरणातील मोबाईल क्रमांकांची तपासणी करुन ग्राहकांना पुरविणाऱ्या दलालांचे आणि सहभागी व्यक्तींचेही बिंग फोडले.
पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनात केली गेली कारवाई
पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, उपायुक्त गणेश शिंदे, शाम घुगे, रमेश धुमाळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनुने, अंमलदार दीपक सुंदरकर, सचिन बाहाळे आणि महिला अंमलदार वर्षा घोंगडे यांनी केली. शहरात कुठेही अवैधरित्या देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन केले.
देहविक्री व्यवसायाचे वाढले प्रस्त
शहरातही आता देहविक्री व्यवसायाचे प्रस्थ वाढत चालले आहे. गेल्या काही महिन्यांत अमरावती शहरात ३ ठिकाणी धाडी टाकून देहविक्री व्यवसायाचे भांडाफोड करण्यात आला. काही ठिकाणी चांगल्या रहिवासी क्षेत्रात फ्लॅटमध्ये हा व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकारावर करडी नजर ठेवली आहे.
रिच गार्डनमधील प्रकारही उघड
गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. ६) अमरावती ते नागपूर महामार्गावरील हॉटेल न्यू रिच गार्डन बार अँड रेस्टॉरंट येथे धाड टाकण्यात आली. त्यावेळी तेथे महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. हॉटेलच्या रूममध्ये हॉटेल मालक व प्रवीण किसनराव धुर्वे (३२, रा. महात्मा फुले नगर) हे अवैधरित्या देहविक्रीचा व्यवसाय चालवीत असताना आढळले. देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या हॉटेल मालक व दलालासह एका परप्रांतीय महिलेस ताब्यात घेतले आहे.
हेदेखील वाचा : Chandrapur Crime: माझ्या पत्नीला पळवून का नेलं? विचारणं बेतलं जीवावर; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची तलवारीने केली हत्या






