मसाज पार्लरच्या नावे सुरू होता देहव्यापार
मुंबई : चेंबूरच्या विविध भागात गेल्या अनेक वर्षापासून स्पा सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याची प्रचिती आता पोलिसांनी केलेल्या कारवाईतून आली आहे. येथील दोन ठिकाणी गोवंडी आणि आरसीएफ पोलिसांनी भांडाफोड केला असून, त्यात एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह दुसऱ्या एका तरुणीची सुटका केली आहे.
यातील सर्वांना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठवले आहे. याच गुन्ह्यांत एका महिलेसह 4 जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. वैदूर भागातील दुसऱ्या एका कारवाईत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची आरसीएफ पोलिसांनी सुटका केली. मुलीला वेश्याव्यवसायास प्रवृत केल्याच्या आरोपावरून विकी नावाच्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. विकी हा ऑनलाईन सेक्स रकेट चालवत होता. ग्राहकांच्या मागणीनुसार तो तरुणीसह अल्पवयीन मुलींना पाठवत असे. जेव्हा ही माहिती पोलिसांना समजली तेव्हा पोलिसांनी गेस्ट हाऊसमध्ये जाऊन कारवाई केली. पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून कारवाई केली.
यापूर्वी समोर आला प्रकार
चेंबूरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा युनिट-६ ने दोघांना यापूर्वीच अटक केली आहे. आफताब आलम रमजान अली अन्सारी आणि हरिलाल बंधू चौधरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायदा (पीटा) आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पोक्सो न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह चार मुलींची सुटका केली आहे. आता त्यांना देवनार महिला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.