नियमबाह्य फी म्हणून मागितली लाच
पिंपरी : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यात जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी 30 हजारांची लाच स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या मोहननगर पोलिस चौकी येथे मंगळवारी (दि.15) ही कारवाई केली.
नीलेश रमेश बोकेफोडे (वय 38) असे रंगेहात पकडलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 24 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 11 एप्रिल रोजी तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय तक्रारदाराचे वाहन एका गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केले. ते वाहन सोडविण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे यांनी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 11 आणि 12 एप्रिल रोजी तक्रारीची पडताळणी केली.
पोलिस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे यांनी तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यात जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी 40 हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 30 हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचला. त्यावेळी उपनिरीक्षक बोकेफोडे यांना 30 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतकऱ्याला मागितली एक लाखाची लाच
दुसऱ्या एका घटनेत, वनविभागाच्या जागेत खोदलेल्या खड्डयाप्रकरणी कारवाई न करण्यासाठी शेतकऱ्याकडून एक लाख रुपयाची लाच घेताना वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. गोविंद रामेश्वर निर्डे (वय ३२) असे अटक केलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याबाबत एका शेतकरी तरुणाने एसीबीकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात निर्डे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.