• यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक निखिल रणदिवे 5 डिसेंबरपासून बेपत्ता; वरिष्ठांकडून मानसिक छळाचे आरोप
• लेकीच्या पहिल्या वाढदिवशी रजा नाकारल्याचे, भावनिक स्टेटसनंतर संपर्क तुटल्याने खळबळ
• कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे धाव; शोधासाठी पाच पथके रवान, तपास सुरू
पुणे : पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस नाईक निखिल रणदिवे हे गेल्या ५ डिसेंबर पासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. निखिल रणदिवे यांना त्यांच्या वरिष्ठांकडून त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून निखिल रणदिवे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. निखिल रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितल्यानंतर पोलीस दलाकडून त्यांना शोधण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. पोलिसांनी पाच पथके तयार केली आहे. निखिल रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यात त्यांनी गंभीर आरोप केले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस देखील ठेवले होते.
सोशल मीडिया पोस्टवर काय?
निखिल रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. निखिल रणदिवे यांच्या मुलीचा फोटो ठेवत “बाळा आज तुझा पहिला वाढदिवस, खूप चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस खात्यात नोकरीला आहे, जिथे वरिष्ठांची मनमानी चालते… दीदी तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे निखिल रणदिवे यांनी या स्टेटसमध्ये म्हटले होते. या मेसेजनंतर काही वेळातच त्यांनी स्वतःचा फोटो ‘भावपूर्ण श्रद्धांजली’च्या फ्रेममध्ये पोस्ट केला आणि आपला मोबाईल स्विच ऑफ केला. तेव्हापासून त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही.
निखिल रणदिवेंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलेली सुसाईड नोट
निखिल रणदिवे यांनी 4 डिसेंबरला वरिष्ठ अधिकारी बापूराव दडस यांना एक ई-मेल पाठवला होता. या ई-मेलमध्ये त्यांनी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख गेल्या वर्षभरापासून आपल्याला त्रास आणि मानसिक छळ करत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचेही या मेसेजमध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.
मुलीच्या वाढदिवसासाठी केला होता अर्ज
काही दिवसांपूर्वीच निखिल रणदिवे यांची शिक्रापूर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. निखिल रणदिवे यांच्या मुलीचा 5 डिसेंबरला वाढदिवस होता. त्यांनी मुलीच्या वाढदिवसासाठी रजेचा अर्ज केला होता. मात्र, यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी रजा देण्यास नकार दिला. त्यानंतर निखिल रणदिवे यांनी व्हॉटसअॅपवर स्टेटस ठेवले होते.
निखिल रणदिवे यांची मागणी
रणदिवे यांचे स्टेटस पाहताच त्यांच्या सहकारी आणि नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. त्यांचे भाऊ अक्षय रणदिवे यांनी याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निखिल रणदिवे यांच्या पत्नी अक्षदा रणदिवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रा केली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावा, अशी मागणी निखिल रणदिवे यांच्या पत्नीने केली आहे.
दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हेदेखील नारायण देशमुख यांना वाचवत असल्याचा आरोप रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस दलाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Ans: 5 डिसेंबरपासून बेपत्ता असून त्यांचा शोध पोलीस पथके घेत आहेत.
Ans: मानसिक छळ, बदली रोखणे आणि मुलीच्या वाढदिवशी रजा नाकारणे असे गंभीर आरोप केले.
Ans: 5 शोधपथके नियुक्त, तक्रार दाखल. पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले असून तपास वरिष्ठांकडून सुरू आहे.






