संग्रहित फोटो
पुणे : चांदीच्या अंगठ्यांना सोन्याचा मुलामा लावून त्यावर बनावट हॉलमार्क टाकत सोनाराची फसवणूक करणार्या चौघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी संगणमताने ही फसवणूक केली आहे. आरोपींकडून चार बनावट अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ओमप्रकाश शामसुंदर परदेशी (५८, रा. वडगावशेरी), फय्याज चांद सय्यद (३५, रा. वडगाव शेरी), आरिफ खलील शेख (४१, रा. येरवडा), शरण माणिकराव शिलवंत (४६, रा. धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ३५ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी यांचे वडगावशेरी भागात सोने खरेदी विक्रीचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी रिक्षामधून दोघेजण त्यांच्याकडे आले. त्यांनी सोन्याच्या अंगठ्या असल्याचे भासवून ४ अंगठ्या गहाण ठेवून त्याबदल्यात एक लाख रुपये घेतले. या अंगठ्या बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनाराने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानूसार चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपींचा शोध घेतला. तांत्रिक तपासावरून आरोपी परदेशीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या तपासावरून उर्वरीतल तिघांना ताब्यात घेतले. त्यावेळी चौघांनी संगणमताने हा गुन्हा केल्याचे समोर आले.
आरोपी शेख हा शिलवंत याच्याकडून या बनावट अंगठ्या घेत होता. तर, परदेशी आणि सय्यद या अंगठ्या विकून फसवणूक करीत होते. त्यांनी आणखी कुणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, दत्तप्रसाद शेडगे याच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
हे सुद्धा वाचा : खळबळजनक! शाळेतील विद्यार्थीनीचे फूस लावून अपहरण, आता पोलिसांनी थेट…
उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने पिंपरी- चिंचवड मधील उच्चशिक्षित तरुणाची ८० लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते. याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो. याबद्दल ते पटवून द्यायचे. पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चशिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ८० लाख रुपयांना गंडा घातला आहे.