फोटो सौजन्य - Social Media
बहुचर्चित ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठी भाषेचे महत्त्व, आजची शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक वास्तव यांचा प्रभावी वेध घेणारा हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. त्यामुळेच चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या प्रमोशनला वेग आला आहे.
याच प्रमोशनचा एक भाग म्हणून पुण्यात एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. मराठी भाषा आणि शिक्षण व्यवस्थेच्या प्रश्नांबाबत सातत्याने संवेदनशील भूमिका मांडणारे दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि समविचारी ॲड. अभिजीत पोखरणीकर यांच्या पुढाकारातून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला. ॲड. अभिजीत पोखरणीकर हे एज्युकेअर दादाची शाळा एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक असून, हा ट्रस्ट पुण्यातील सिग्नलवर राहणाऱ्या मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी कार्यरत आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चलचित्र मंडळी यांच्या वतीने आणि एज्युकेअर दादाची शाळा एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या सहकार्याने सिग्नल स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या तब्बल १०० विद्यार्थ्यांना ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट दाखवण्यात आला. पुण्यातील राहुल थिएटर येथे आयोजित या विशेष शोमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात चित्रपट पाहिला. विशेष बाब म्हणजे या मुलांपैकी अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा अनुभव घेतला. मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद, थिएटरचे वातावरण आणि कथेशी निर्माण झालेली भावनिक नाळ यामुळे हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता. शिक्षणाचे महत्त्व, शिक्षक-विद्यार्थी नाते आणि मराठी माध्यमाचे मूल्य याबाबत चित्रपटातून मिळालेला संदेश त्यांच्या मनात खोलवर रुजल्याचे जाणवत होते. अशा उपक्रमांमुळे समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत दर्जेदार सिनेमा पोहोचू शकतो, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच पदार्पण करणारी लोकप्रिय युट्यूबर प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळते. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. सहनिर्माते म्हणून विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ यांनी जबाबदारी सांभाळली आहे. समाजभान जपत राबवलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, चित्रपटाच्या आशयाला खरी सामाजिक उंची देणारा ठरला आहे.






