पुण्यामध्ये अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली आहे (फोटो - iStock)
पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये हुक्का पार्लर आणि ड्रग्ज सेवन केले जात असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. आता मार्केटयार्ड भागात ‘द बिलियन्स’ हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा कारवाई केली. युनिट पाचच्या पथकाने छाप्यात हुक्का पॉट व फ्लेवर जप्त केले असून, याप्रकरणी हॉटेल चालकासह चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांत आरीफ शब्बीर शेख (वय २४ , रा. साईबाबा नगर, कोंढवा खुर्द) याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. युनिट पाचचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार कानिफनाथ कारखेले, उमाकांत स्वामी, शेखर काटे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यादरम्यान मार्केटयार्ड भागात अवैध हुक्का सुरू असल्याची माहिती युनिट पाचचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना मिळाली. त्यानुसार पथकाने दि बिलीयन्स हॉटेल येथे छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये हुक्का सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी येथून पॉट, हुक्का फ्लेवर आणि इतर असा एकूण ३२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात हुक्का विक्री करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. तसेच, एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का सुरू असल्यास तेथील अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले होते. मात्र, त्याकडे काणाडोळा करून अनेक ठिकाणी हुक्का पार्लर किंवा हॉटेलमध्ये हुक्का पुरवला जात असल्याचे दिसते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विश्रांतवाडीत गांजा विक्री करणाऱ्या महिलेला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. महिलेकडून १३ छोट्या प्लॅस्टिकच्या गांजाच्या पुड्या जप्त केल्या आहेत. लता रमेश मोहीते (वय ६० वर्षे, रा. वडार वस्ती, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. युनिट चारचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. विश्रांतवाडी भागात पेट्रोलिंग करत असताना वडार वस्ती येथे एक महिला संशयास्पद थांबल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, महीला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले. त्यावेळी तिच्याकडे गांजा आढळून आला.