वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी पत्रकारांच्या प्रश्नावर राजेंद्र हगवणेचे संतापजनक उत्तर
Vaishnavi Hagavane News: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात आज (२३ मे) सकाळी फरार आरोपी सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना बावधान पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रकरणात नव्या घडामोडींचा वेग वाढला आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप सासरच्या मंडळींवर केला होता. यापूर्वीच तिचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे, आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक झाली होती.
राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना अटक केल्यानंतर त्यांना आजच शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्ट परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांच्या अटकेनंतर माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नावर राजेंद्र हगवणे यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, आणखी काही नावे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी महिला आयोगाची भूमिका काय? रुपाली चाकणकर म्हणाल्या…
अटकेनंतर न्यायालयाच्या परिसरात पत्रकारांनी वैष्णवीचे सासरे राजेंद्रला काही प्रश्न विचारले, ‘हगवणे, तुला पश्चाताप होतोय का?’ यावर राजेंद्रने नकारार्थी मान हलवत आणि हातांच्या इशाऱ्याने त्याला कोणताही पश्चाताप होत नसल्याचे मुजोरपणे सांगितले. पण त्याच्या या उत्तराने त्याच्याविरुद्धचा संताप आणखीच वाढला. राजेंद्र हगवणेच्या या वर्तणुकीमुळे आणि मुजोरीमुळे त्याच्याविरोधात सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सात दिवस फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे अटकेपूर्वी दोघेही एका हॉटेलमध्ये मटण खाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले, ज्यामुळे प्रकरणाने नवे वळण घेतले आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांच्या सहा विशेष पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि स्वारगेट परिसरातून पहाटेच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेमुळे बावधन पोलिसांना मोठे यश मिळाले असून, या कारवाईमुळे तपासात वेग आला आहे.
मुळशी तालुक्यातील आपल्या सासरच्या घरी वैष्णवी हगवणे हिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैष्णवीच्या वडिलांनी, अनिल कस्पटे यांनी मुळशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत सासरच्या पाच सदस्यांवर – शशांक (पती), लता (सासू), करिश्मा (नणंद), राजेंद्र (सासरे) आणि सुशील (दिर) – मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा माजी तालुका अध्यक्ष होता. मात्र प्रकरण गंभीर बनताच अजित पवार यांनी राजेंद्र आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली. सुप्रिया सुळे यांनी निष्पक्ष तपासाची मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.