चिपळूण : रत्नागिरी MIDC परिसरात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांना याचा सुगावा लागताच तपासा दरम्यामन पोलीसांनी व्हेल माशाच्या उलटी जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 3 कोटीपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. विक्रीसाठी आणलेली तब्बल 3 कोटी रुपयांहून अधिक किमतीची ‘व्हेल माशाची उलटी’ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून, हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील वन्यजीव तस्करीचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दि.30 ऑक्टोबरला रात्री 9 वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला एमआयडीसी रत्नागिरी परिसरातील टीआरपी ते एमआयडीसी रोडवर, बाफना मोटर्स कंपनीजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला काही संशयित व्यक्ती व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी छापा टाकला. यावेळी, आसीफ अस्लम मोरस्कर वय 38, रोहीत रमेश चव्हाण वय 31, आणि तेजस कांबळे वय 32, हे तिघे संशयित रित्या आढळले. हे तीनही आरोपी मूळ रत्नागिरीतील असल्याचं पोलीसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली. त्यावेळी असं लक्षात आलं की ,कोणताही परवाना नसताना, प्रतिबंधित असलेली, सफेद काळपट रंगाची व्हेल माशाची उलटी जप्त केली. वजन काट्यावर मोजणी केली असता, प्लास्टिक पिशवीसह तिचे वजन 3किलो 4 ग्रॅम इतके भरले आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत 3 कोटी रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत जप्त केलेल्या मालामध्ये 3 कोटी रुपयांच्या ‘व्हेल माशाच्या उलटी’सह, 2,30,000 रुपये किमतीची यामा कंपनीची मोटार सायकल (क्र. एमएच.08. बीजे. 1988) आणि 8,00,000 रुपये किमतीची सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (क्र. एमएच. 08 एएक्स. 4293) असा एकूण 3,10,30,000/-(तीन कोटी दहा लाख तीस हजार) रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपींविरोधात वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972च्या कलम 39, 42, 43, 44, 48, 51 आणि 57 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे. ही कारवाई वन्यजीव तस्करीच्या साखळीला मोठे आव्हान देणारी ठरली असून, रत्नागिरीत इतक्या मोठ्या प्रमाणात ‘व्हेल माशाची उलटी’ जप्त होण्याची ही दुर्मिळ घटना आहे.






