कल्याण : इंस्टाग्रामवर मित्रासोबत एका विद्यार्थीनीने एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली आणि त्यावर चर्चा सुरु झाली होती. शाळा प्रशासनाने तीन विद्यार्थ्यांना घरी पाठवत तुमचा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्या घरी येईल अशी ताकीद दिली. तिघांपैकी अनिश दळवी या विद्यार्थ्याने शाळा सोडल्याचा दाखला घरी येण्याच्या भीतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणारा १६ वर्षीय अनिश अनिल दळवी हा कल्याणनजीकच्या सीक्रेट हार्ट शाळेत इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकत होता. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी शाळेवर गंभीर आरोप केले आहे. आता याप्रकरणी टिटवाला पोलिसांनी शाळेच्या संचालक ऑलविन अँथोनी याच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
कल्याण तालुक्यातील निलंवली गावात राहणारा अनिश दळवी हा कल्याणनजीकच्या वरप परिसरातील सीक्रेट हार्ट शाळेत इयत्ता ११ वीत शिकत होता. बुधवारी सकाळी अनिश याला शाळेने घरी पाठविण्यात आले होते. अनिश घरी आला, त्याने राहत्या घरी गळफाश घेऊन आत्महत्या केली. अनिशच्या आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदानासाठी कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला. अनिशच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, अनिश सोबत शाळेत गैर प्रकार घडला. त्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली, एकाद्या मुलगा काही गैरप्रकार करीत असेल त्याची माहिती शाळा व्यवस्थानाने पालाकांना दिली पाहिजे. तीन मुलांपैकी दोन मुलांच्या पालकाना शाळेने बोलावून घेतले होते.
अनिशच्या पालकांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही. अनिशने याचा धसका घेतला. त्याने आत्महत्या करुन जीवन संपविले. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे. टिटवाला पोलिसांनी आता या प्रकरणात ऑलविन अँथोनी या शाळेचा संचालकांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी यांना कल्याण कोर्टात हजर केले जाणार आहे अशी माहिती टिटवाला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेचा पुढील तपास टिटवाळा पोलिसांचा सुरु आहे.