फोटो सौजन्य - Social Media
शिवसेना (शिंदे गट) चे आमदार आणि राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट घेताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असला, तरी सरनाईक यांनी ती केवळ दिवाळीच्या सदिच्छा भेटीपुरतीच असल्याचे स्पष्ट केले.
सरनाईक यांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे यंदाही मी शरद पवार साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटलो. ही भेट फक्त आदर आणि सदिच्छेच्या भावनेतून झाली असून, तिचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.” त्यांनी पवारांसोबतच्या चर्चेत कोणतेही राजकीय विषय झाले नसल्याचेही ठामपणे नमूद केले.
शरद पवार आणि प्रताप सरनाईक यांच्यातील संबंध पूर्वीपासूनच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे या भेटीला काहींनी राजकीय अर्थ लावला असला, तरी दोन्ही नेत्यांच्या जवळच्या सूत्रांनी ही भेट केवळ सौजन्यपूर्ण असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सरनाईक-पवार भेटीने नवा अंदाज निर्माण केला आहे. अलीकडच्या काळात विरोधकांमध्येही संवादाचे पूल बांधले जात असल्याचे चित्र आहे. त्यातच सत्ताधारी गटातील प्रमुख नेत्याची विरोधी गटाच्या ज्येष्ठ नेत्याशी झालेली भेट या चर्चांना अधिक चालना देणारी ठरली. सरनाईक यांनी मात्र माध्यमांशी बोलताना कोणत्याही राजकीय चर्चेला थारा न देता सांगितले की, “पवार साहेबांविषयी माझ्या मनात कायम आदर आहे. मी त्यांच्या आशीर्वादासाठी गेलो होतो. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही.”
राजकीय निरीक्षकांच्या मते, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात प्रत्येक हालचाल लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे सरनाईक-पवार भेट ही दिवाळीच्या निमित्ताची सदिच्छा भेट असली, तरी तिचा राजकीय अर्थ लावण्याचा मोह अनेकांना आवरलेला नाही.






