स्मृती मानधना(फोटो-सोशल मीडिया)
Smriti Mandhana’s century against New Zealand : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकातील एका महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडसोबत दोन हात करत आहे. उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे महत्त्वाचा आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली, सलामीवीर स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी २१२ धावांची भागीदारी रचत भारताच्या धावसंख्येचा पाया रचण्यात मोठी मदत केली. दरम्यान, स्मृती मानधनाने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवला आणि शानदार शतक ठोकून अनेक विक्रम आपल्या नावे केले आहे.
स्मृती मानधनाने ९५ चेंडूत १०९ धावांची धमकेदार खेळी केली आहे, ज्यामध्ये तिने १० चौकार आणि ४ षटकार लगावले आहेत. तिच्या फलंदाजीतून आत्मविश्वास झळकत होता. न्यूझीलंडविरुद्धच्या या खेळीने मानधनाने अनेक ऐतिहासिक विक्रम देखील मोडीत काढले आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या शतकासह, स्मृती मानधनाने महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासात एक नवा टप्पा गाठला आहे. तिने न्यूझीलंडची दिग्गज फलंदाज सुझी बेट्सला पिछाडीवर टाकत महिला एकदिवसीय इतिहासात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक शतके ठोकणारी फलंदाज ठरली आहे. स्मृती मानधनाच्या नावावर आता १४ शतके जमा झाले आहेत. तिच्या पुढे आता फक्त ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग असून जिच्या नावे १५ शतके जमा आहेत. यासह, स्मृती मानधनाने सक्रिय महिला क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू देखील बनली आहे.
मानधनाचे न्यूझीलंडविरुद्धचे हे शतक महिला एकदिवसीय विश्वचषकातील तिसरे शतक आहे. यासह तिने कर्णधार हरमनप्रीत कौरची बरोबरी साधली आहे. दोघींच्या नावे विश्वचषकात प्रत्येकी तीन शतके जमा आहेत. यानंतर भारताची माजी कर्णधार मिताली राजच्या नावे २ शतकं आहेत. मानधनाला येत्या सामन्यांमध्ये हरमनप्रीत कौरच्या पुढे जाण्याची संधी असणार आहे.
हेही वाचा : IND W vs NZ W : न्यूझीलंडविरुद्ध प्रतीका रावलचा शतकी तडाखा! विश्वविक्रमाच्या यादीत ‘रॉयल’ एंट्री
स्मृती मानधना या वर्षी चांगलीच फॉर्म दिसून येत आहे. तिचा उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत तिने २०२५ मध्ये महिला क्रिकेटपटूने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील आता मोडीत काढला आहे. तिने या वर्षी आधीच ३० षटकार मारले आहेत आगामी सामन्यांमध्ये हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.