File Photo : Suicide News
मूल : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील प्रापर्टी डिलरने येथील एका लॉजवर गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 29) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. सुनील कृष्णाजी देरकर (वय 53) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
प्रापर्टीचा व्यवसाय करणारे वणी येथील वार्ड नं. 2 मधील सुनील देरकर व्यवसायानिमित्त मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मूल येथे आले. येथील बस स्थानकालगत असलेल्या न्यू उपाध्याय लॉज येथे खोली भाड्याने घेऊन राहत होते. रोज सकाळी 11 वाजतानंतर बाहेर जाणे आणि सायंकाळी परत येणे अशी त्यांची दिनचर्या होती. घटनेच्या दिवशी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास खोलीची स्वच्छता करण्यासाठी नोकराने दार ठोठावले. तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही.
देरकर झोपले असावे असे समजून नोकर निघून गेला. पुन्हा दुपारी तीनच्या दरम्यान नोकराने खोलीचे दार वाजविले. परंतु, काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नोकराला शंका आली. हा प्रकार त्याने बाहेरगावी असलेल्या लॉज मालक लोकेश उपाध्याय यांना सांगितला.
लागलीच लोकेश उपाध्याय मूलला पोहोचल्यानंतर संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सुनील देरकर यांनी पंख्याला गळफास लावल्याचे दिसले. घटनेची माहिती मृतकाच्या नातेवाईकाला देण्यात आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास मूल पोलिस करत आहेत.