संग्रहित फोटो
अकोला : पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बुधवारी रात्री बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. बिश्नोई गँगने काँग्रेसचे नगरसेवक आकाश कवडे यांना फोन करून आमदार पठाण यांनी ऐकले नाही आणि खंडणी दिली नाही, तर त्यांना गोळ्या घालू तसेच त्यांच्या मुलालाही सोडणार नाही, अशी धमकी व्हॉटस्अॅप कॉलवरून बुधवारी रात्री ८.३० वाजता दिली आहे. यासंदर्भात नगरसेवक आकाश कवडे यांच्याशी संपर्क साधला असता धमकीचा फोन आल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणात अद्याप पोलिसात तक्रार केली नाही. आमदारांना बिश्नोई गँगकडून धमकी मिळण्याची ही दुसरी वेळ आहे.
काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा मुद्दा गुरूवारी विधानसभेत उपस्थित झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आणि विधिमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पठाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करतानाच काँग्रेस आमदारांनी आक्रमक पवित्रा धारण केला. याप्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दखल घेत पठाण यांच्या सुरक्षा प्रकरणी योग्य निर्णय घेण्याची सूचना सरकारला केली. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषयही विरोधी पक्षांकडून सभागृहात उपस्थित करण्यात आला. मात्र स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा नाकारण्यात आल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
धमक्यांना भीक घालत नाही
याप्रश्नी भूमिका मांडताना साजिद पठाण म्हणाले की, या धमकीच्या विषयासंदर्भात मला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. या अगोदर ज्यावेळी मला धमकीचा फोन आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून फोन केला होता. त्यावेळी त्यांनी मला माझ्या संरक्षणाची हमी, पोलिस संरक्षण पुरविले होते. मात्र एखाद्या सदस्याला वारंवार अशा प्रकारच्या धमक्या येत असतील तर हे प्रकरण गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, अशा धमक्यांना आपण भीक घालणार नाही.
दोन दिवसांत निर्णायक कारवाई – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच विधानसभेत बिष्णोई टोळीसंदर्भात निर्णायक कारवाई करण्याचे घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेला ४८ तास उलटताच, अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचे प्रकरण गुरुवारी समोर आले आहे. याप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांनी गुरुवारी विधानसभेत आक्रमक पवित्रा धारण केला.
सुरक्षेची जबाबदारी सरकारची
दरम्यान, यासंदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, राज्यातील विधानसभा आमदार, विधानपरिषद आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षितेची गरज लक्षात घेता यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना यावेळी विधानसभा अध्यक्षांनी केली.






