संग्रहित फोटो
बारामती : दौंड तालुक्यातील खुटबाव येथे जुलै २०२० मध्ये घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अशा दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज बारामती न्यायालयाने दिला आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका महिलेसह पुरुषाची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार याला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.
खटल्याच्या हकीकतीनुसार, ३० जुलै २०२० रोजी खुटबाव (ता. दौंड, जि. पुणे) येथे ही घटना घडली होती. आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार (रा. सदगुरू कॉलनी, वेणूनगर, वाकडरोड, वाकड, ता. हवेली, जि. पुणे) याने मनिषा जाधव आणि गुलचंद निकम यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना लाकडी काठी व लोखंडी कोयत्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी करून त्याने दोघांचाही खून केला होता.
हत्या केल्यानंतर आरोपीने तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी आपले खरे नाव लपवून खोटे नाव सांगितले होते. या प्रकरणी फिर्यादी पोपट बाबूराव कांबळे यांनी ३१ जुलै २०२० रोजी यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध गु.र.नं. ७४७/२०२० अन्वये भा.द.वि. कलम ३०२, १७६ आणि १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून बारामती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील ईश्वर वसेकर यांनी कोर्टात सबळ पुरावे सादर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली, यामध्ये भा.द.वि. कलम ३०२ (खून): जन्मठेप (सश्रम कारावास) आणि ५,००० रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद,भा.द.वि. कलम १७६: ६ महिने साधी कारावासाची शिक्षा,भा.द.वि. कलम १७७: ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या साक्षीदार क्र. ८ बालाबाई देवीदास जाधव यांची साक्ष या खटल्यात अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक ठरली. आरोपीने दोन्ही मृत व्यक्तींना लोखंडी कोयता आणि लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारल्याचे न्यायालयाने मान्य केले. तपास अधिकारी बी. एन. पाटील यांचीही साक्ष नोंदवण्यात आली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सागर माने यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस नाईक वेणूनाद ढोपे, कोर्ट पैरवी गोरख कस्पटे व सहाय्यक फौजदार ए. जी. कवडे यांनी सहकार्य केले.






