संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, ससून रुग्णालय परिसर तसेच वारजे भागात पादचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी बंडगार्डन आणि वारजे पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण भोसरीत राहायला आहे. तो सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ससून रुग्णालयाजवळून निघाला होता. ससून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाच चोरट्यांनी त्याला अडवले. त्याला कोयत्याचा धाक दाखवून १५ हजार रुपयांचा मोबाइल चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत वारजेतील रामनगर परिसरात पादचारी तरुणाला कोयत्याच्या धाकाने लुटले असून, त्याच्याकडील ३०० रुपयांची रोकड लुटून नेली आहे. याबाबत २३ वर्षीय तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण रामनगर भागात राहायला आहे. तो ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण करुन बाहेर पडला. त्या वेळी चौघांनी त्याला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील रोकड काढून घेतली. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे अधिक तपास करत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला पुण्यात लुटले
राज्यात लुटमारीच्या घटना प्रमाणात उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातमधील पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला धमकावून लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणाचे अपहरण करुन त्याला नदीपात्रात लुटण्यात आले. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बलभद्रसिंग नटवरसिंग जाडेजा (वय २५, सध्या रा. नलावडे सदन, गावकोस मारुतीजवळ, कसबा पेठ, मूळ रा. कच्छ, गुजरात) याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.