फोटो सौजन्य - Social Media
एका प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाला गाठून भर रस्त्यात बेदम मारहाण केली. जवळपास नऊ दिवसानंतर दहा पैकी दोन आरोपींना अटक झाली आहे. आत्ता या प्रकरणात पिडीत तरुणाच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलिसांवर गंभीर आरोप करीत या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांकडे वर्ग करा अशी मागणी केली आहे. या प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. तसेच सगळ्यांचे लक्ष या प्रकरणाकडे लागून आहे.
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
काही दिवसापूर्वी उसाटणे गावातील तरुण आदित्य मढवी याला कोळेगाव परिसरात त्याच्या कारबाहेर खेचून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मिलिंद मढवी सह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला कोर्टाने १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टातून निघालेला आरोपी तीन तास पोलिस ठाण्यात पोहचला नाही. या कालावधी आरोपी गेला कुठे असा प्रश्न आहे. पिडीत आरोपीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. एक तर घटनेच्या आठ दिवसानंतर काही आरोपीना अटक होते. त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. आरोपी मिलिंद मढवी हा खाजगी गाडीत त्या दिवशी वापरलेले हत्यार घेऊन पोलिस ठाण्यात शरण येतो. काही क्षणात पोलिस त्याला कोर्टात घेऊन जातात.
या प्रकरणात आरोपी हे धनाढ्य असून, त्यांच्याकडून कुटुंबीयांच्या जिवीतला मोठा धोका आहे, असे पिडीत तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, पोलिसांकडून जी मदत हवी होती, ती अजिबात मिळत नाही आणि पोलिसांकडून आरोपीला ज्या प्रकारे मदत केली जात आहे, ते पाहून त्यांना न्याय मिळवण्याच्या बाबतीत शंका येत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी आरोपींविरुद्ध योग्य पावले उचलली नाहीत आणि त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळवण्याची शक्यता कमी वाटते.
या सर्व परिस्थितीमुळे, पिडीत तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. कुटुंबीयांना विश्वास आहे की, क्राईम ब्रांच कडून तपास लवकर आणि प्रभावीपणे करण्यात येईल. पिडीत तरुणाचे भाऊ हेमंत मढवी आणि आई संगिता मढवी यांनी पोलिस आयुक्तांकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून काय कारवाई केली जाते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.