संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील एफ.सी रस्त्यावरील सागर आर्केड येथील फुटपाथवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकार्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेसह चौघांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधुरी समीर मराठे (वय ३२, रा. कोथरूड), गालिब अब्दुल मजिद शेख (वय २७, रा. जनवाडी) व अन्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सचिन घेंगे (वय २९, रा. मांजरी) यांनी तक्रार दिली आहे. सोमावारी (दिनांक ६) सायंकाळी ही घटना घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनूसार, एफ.सी रस्त्यावरील फुटपाथवर अवैधरित्या व्यवसाय थाटण्यात आले आहेत. अनेक फेरीवाल्यांकडून येथे व्यवसाय केले जातात. परिणामी ये जा करणार्या पादचार्यांना त्रास होतो. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेकडून एफ. सी रस्त्यावरील फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी सांयकाळी येथील सागर आर्केड समोरील फुटपाथवर फिर्यादी घेंगे व त्यांचे सहकारी अतिक्रमण हटविण्याचे काम करीत होते. यावेळी आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यातील एकाने फिर्यादींची कॉलर पकडून अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डेक्कन पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : मी शेवटचं सांगतो, शहर सोडून जा, नाहीतर…; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दम
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.