संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : अमली पदार्थ तस्कर, टोळ्यांचे प्रमुख, कुख्यात गुन्हेगार अन् रस्त्यावर दहशत माजविणाऱ्यांवर जरब बसविण्यास यशस्वी ठरलेल्या पुणे पोलिसांना मात्र, ‘पाहिजे व फरार’ आरोपींच्या मुसक्या आवळल्यात सपशेल अपयश येत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षातील स्थिती पाहता या गुन्हेगारांची संख्या कमी होण्यापेक्षा ती साडे चारशेंने वाढली आहे. त्यासोबतच मोक्कात गेल्या काही वर्षात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मोक्कातील देखील तब्बल ४३ गुन्हेगार शोधायचे आहेत.
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात कोयता गँग, टोळी युद्ध, रस्त्यावरची हाणामारी ते सुपाऱ्या घेऊन खून सोबतच अपहरण, दरोडा, लुटमार, सोन साखळी, वाहन चोरी, घरफोडी यासह विविध गुन्ह्यांनी पुण्याची शांतता भंग केली आहे. या गुन्हेगारांमुळे पुण्याची ओळख अनेकवेळा वेशीवर टांगली जाते. गुन्हेगार दहशत माजवत, आरजकता माजवत पुणे पोलिसांना चॉलेंज देत आहेत. आता अल्पवयीन मुलांमुळे आणखीनच डोकेदुखी वाढली आहे. अशा विविध गुन्ह्यांतील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणे पुणे पोलिसांसाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पोलिसांना तब्बल ३ हजार गुन्हेगार हवे आहेत. यात २ हजार ९३३ “पाहिजे” अन् ४८ “फरार” आरोपी आहेत. ही संख्या गेल्या दोन वर्षात वाढली आहे. सहसा ही संख्या वर्षाला कमी होणे अपेक्षित आहे. पण, फरार व पाहिजे आरोपींचा शोध लागत नसल्याचे दिसत आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयाची स्थापना १९६५ ची
पुणे पोलिस आयुक्तालयाची स्थापना १ जुलै १९६५ रोजी झाली. पानशेतच्या पुराने वाढलेल्या पुण्याला बंदोबस्तासाठी आयुक्तालय असावे, अशी शिफारस तत्कालीन प्रशासक स. गो. बर्वे यांनी केली होती. आयुक्क्तालयाअंतर्गत काही मोजकी पोलिस ठाणी होती. मात्र, हळुहळु शहराची लोक संख्या व विस्तार झाला. आता पुण्यात एक सायबर व स्थानिक ३९ पोलीस ठाणी आहेत.
दत्तक योजना ढेपाळली?
पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी “गुन्हेगार दत्तक” योजना दोन वर्षांपुर्वी सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत संबंधित पोलीस ठाण्यातील प्रत्येक पोलीस अंमलदारास एक फरारी व एक पाहिजे आरोपी दत्तक देऊन त्यांना शोधणे बंधनकारक केले होते. यानूसार, आरोपींचा शोध घेतला जात होता. परंतु, आकडेवारी पाहता ही योजना ढेपाळली गेली असल्याचे दिसत आहे.
पाहिजे व फरारींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून सतत पाठपुरावा केला जातो. अनेकवेळा माहिती मिळते पण, ती बनावट असते. पण, पोलीस त्यानंतर त्याचा शोध सुरूच ठेवतात. अनेक महिन्यानंतर पोलिसांना यश येते. पण, त्यासाठी सातत्य असणे गरजेचे आहे. दरम्यान, पाहिजे व फरार आरोपींना पकडण्यात विशेष परिश्रम घेणे तसेच त्यांना पकडण्यात यशस्वी होणाऱ्या पोलीस अंमलदार व त्यांच्या सहकार्यांना बक्षिस देखील दिले जाते.
मोक्कातील ४३ गुन्हेगार फरार
पुणे पोलिसांनी गेल्या काही वर्षात मोक्का व एमपीडीएसारख्या कडक कारवाईची ऐतिहासीक कामगिरी केली आहे. शतकी खेळी करणाऱ्या मोक्कातील गुन्हेगारांची जामीनावर बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांची संख्या जशी जास्त आहे, तशी फरार झालेल्या गुन्हेगारांचीही संख्या मोठी आहे. वेगवेगळ्या ९ पोलिस ठाण्यातील मोक्काच्या गुन्ह्यातील तब्बल ४३ गुन्हेगार पोलिसांना शोधायचे असून, ते फरार आहेत.