संग्रहित फोटो
पुणे : तरुणीला व्हिडीओ व्हायरल करण्याची भिती दाखवून तिच्याकडे ५ लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांनाही वारजे पोलिसांनी सापळा लाऊन रक्कम घेताना पकडले. याप्रकरणी २३ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार २२ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, तरूणीला इन्स्टाग्राम अकाउंटवर संदेश व खासगी व्हिडीओचे स्क्रिनशॉट पाठवून तिला खासगी व्हिडीओ लिक करण्याची भिती दाखवली. तसेच ते व्हिडीओ लिक करायचे नसल्यास पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. यावेळी खंडणी घेण्यासाठी आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडले. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मनोज शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; गावठी दारू भट्ट्या केल्या उद्ध्वस्त
फसवणुकीचे प्रमाण वाढले
पुण्यात फसवणूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही महिन्याखाली सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून ७० लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने पळविल्याचे समोर आले आहे. याबाबत ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार पाषाण भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी सप्टेंबर महिन्यात त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक मॅसेज पाठविला. त्यात त्यांना एका गुन्ह्यात तुमचे नाव असल्याचे सांगत आम्ही पोलीस असल्याची बतावणी केली. पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र देखील पाठविले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यांना तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंगचा व्यवहार झाला आहे, असे सांगत याप्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याची भिती दाखवली. गुन्हा दाखल न करणे तसेच तपासात मदत करण्यासाठी सायबर चोरट्यांनी त्यांना तात्काळ पैसे जमा करावे लागतील, असे सांगितले. नंतर त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन खात्यातून ४५ लाख रुपये ट्रान्सफर करून घेत त्यांची फसवणूक केली.
दुसऱ्या घटनेत टिळक रस्ता येथील एका ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला देखील अशाच पद्धतीने २५ लाख रुपयांना गंडा घातला आहे. त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधत त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. चोरट्यांनी २५ लाख ४० हजार रुपये चोरले. चोरट्याने वेगवेगळ्या बँक खात्यात चोरलेली रक्कम हस्तांतरित केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे तपास करत आहेत.