सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला मुंबईतील वांद्रे भागात ही घटना घडली. बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा झिशान याच्या कार्यालय परिसरात असताना, 3 जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यातली 1 गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली होती. त्यांना तातडीनं लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तिसरा आरोपी फरार आहे. तिसऱ्या आरोपीची काही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत सहाभागी असलेल्या तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. पोलिसांनी तिसऱ्या व्यक्तीचे नाव शोधले आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या आरोपीची इतरही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या माहितीनुसार तिसरा आरोपी हा पुण्यात पाच ते सहा वर्षांपासून एका स्कॅप डिलरकडे काम करतोय. त्याने धर्मराज नावाच्या 19 वर्षीय आरोपीला काही महिन्यांपूर्वी पुण्यात बोलवून घेतलं होतं.
त्यानंतर हत्येची सुपारी देणाऱ्या व्यक्तीने शिवा आणि धर्मराज यांची गुरुमेल याच्याशी भेट घडवून आणली होती. गुरुमेल हा 23 वर्षांचा आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. याआधी त्याच्याविरोधात एक हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धर्मराज आणि गुरमेल यांच्या नावावर याआधी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
आता पोलीस या प्रकरणाशी निगडित असणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. पुण्यात राहणारा शिवा नावाचा तिसरा आरोपी सध्या फरार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके पुणे तसेच परराज्यात रवाना झाले आहेत. या हत्या प्रकरणात आणखी एक आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस या आरोपीचाही शोध घेत आहेत.