File Photo : Crime
जालना : शहरालगत असलेल्या नागेवाडीजवळ महामार्गावर गुरुवारी रात्री गावठी पिस्तुलातून गोळीबार करत युवकाला 95 हजारांना लुटले. गोळी छातीत लागल्याने या युवकावर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एकाची लोखंडी सळईने वार करुन हत्या; दारू पाजण्याच्या बहाण्याने नेलं अन्…
लुटमार करताना झालेल्या झटापटीनंतर एका युवकावर दरोडेखोरांनी गावठी पिस्तूलातून गोळीबार करत 95 हजाराला लुटल्याची घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नागेवाडीजवळ गुरुवारी घडली. चंदनझिरा भागातील स्क्रॅपचा व्यापारी शेख इम्रान शेख एजाज (वय १७) हा युवक बुधवारी त्याची ब्रेझा कार दुरुस्तीसाठी 2 लाख रुपयांची रक्कम घेऊन संभाजीनगर येथे गेला होता. कार दुरुस्ती करून व दुरुस्तीचे 1 लाख 5 हजारांचे बिल जमा करून रात्री तो जालन्याकडे निघाला होता. त्याने त्याची ब्रेझा कार नागेवाडी शिवारात असलेल्या स्क्रॅपच्या गोदामात उभी केली.
नंतर तो तेथून दुचाकीने घरी चंदनझिरा येथे निघाला होता. त्याची दुचाकी नागेवाडीजवळ असलेल्या आई अमृततुल्य चहाच्या हॉटेलजवळ येताच तोंडाला काळा रुमाल बांधलेल्या तीन दरोडेखोरांनी अडवली. यावेळी दरोडेखोरांनी इम्रान यास धक्काबुक्की व मारहाण करत पैसे काढून देण्यास सांगितले. मात्र, त्याने प्रतिकार करत नकार दिल्याने त्याच्यात आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार झटापट झाली. त्याचवेळी त्यातील एका दरोडेखोराने गावठी पिस्तूलातून एक गोळी इम्रान याच्या दिशेने झाडली. त्यांनतर तो खाली पडल्यानंतर त्याच्याजवळ असलेले 95 हजार रुपये हिसकावून घेऊन दरोडेखोर शेतातून पळून गेले.
छातीत लागली गोळी
इम्रान याच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळी लागली असून, नातेवाईकांनी रात्रीच त्याला संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. जखमीच्या छातीत गोळी अडकलेली असून, शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढावी लागणार असल्याचे समजते. चंदनझिरा पोलिसांनी जखमी युवकाचा जवाब नोंदवला आहे.
हेदेखील वाचा : घरात घुसून तिचे हातपाय बांधले, २ निष्पाप मुलांसमोर आईवर लैंगिक अत्याचार करून तोंडवर फेकले अॅसिड!