संग्रहित फोटो
पुणे : राज्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे बंद घरे फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक चोरीची बातमी आली आहे. बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा ७ लाख ३३ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना लोकमान्यनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ६७ वर्षीय ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरात राहतात. शनिवारी (२६ जुलै) त्या फ्लॅट बंद करुन बाहेर गेल्या होत्या. तेव्हा चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा सात लाख ३३ हजारांचा ऐवज लांबविला आहे. रविवारी सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. सहायक निरीक्षक राजेश उसगावकर अधिक तपास करत आहेत.
आंबेगाव परिसरात सोसायटीतील फ्लॅट फोडला
कात्रज भागातील आंबेगाव परिसरात एका सोसायटीतील फ्लॅट फोडला आहे. चोरट्यांनी ८२ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत आंबेगाव पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदाराची पत्नी रविवारी सकाळी सदनिका बंद करुन कामानिमित्त बाहेर गेली होती. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडले. कपाटातील दागिने लांबवून चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक कळमकर तपास करत आहेत.
चोरट्यांकडून मिठाई चोरी
पद्मावती भागातील मिठाई विक्रीच्या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी रोकड, मिठाई असा ४३ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. सहकारनगर पोलिसांत अज्ञातावर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पद्मावती भागात मिठाई विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मिठाई विक्रीच्या दुकनाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोकड, तसेच मिठाईचे ट्रे चोरून चोरटे पसार झाले. तर हडपसरमधील काळेपडळ परिसरात एका टायर विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ५५ हजारांचे टायर चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत काळेपडळ पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.
डॉक्टर महिलेच्या सदनिकेतून ऐवज लांबविला
विश्रांतवाडीत डॉक्टर महिलेचा बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडून दागिने आणि रोकड असा सात लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत एका डॉक्टर महिलेने येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला विमानतळ रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडले. कपाट उचकटून चोरट्यांनी दागिने् आणि रोकड लांबविली. सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार तपास करत आहेत.