इंदापूरच्या रेड्यात भरदिवसा घरफोडी; घरावरील सर्व पत्रे, लोखंडी अँगल नेले काढून (संग्रहित फोटो)
पाटण : विहे (ता. पाटण) येथे शनिवारी रात्री वारीला गेलेल्या दांपत्याचे घर फोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील साडेआठ तोळे सोने व २० हजार रुपये रोख रक्कम घेऊन ४ चोरटे पसार झाले आहेत. गावातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे निदर्शनास आले. त्यादृष्टीने मल्हारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विहे येथील लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे वास्तव्यास असणाऱ्या आनंदराव गणपत मोरे यांच्या घरामध्ये शनिवारी (दि.२८), रात्री दीडच्या सुमारास चोरी झाली. यामध्ये चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केल्यानंतर समोर असणाऱ्या दाराची कडी कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. घरात कोणीच नसल्यामुळे चोरट्याने घरातील लॉक असणारे कपाट कटावणीने खोलून कप्प्यातील साडेआठ तोळे सोने व २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच कपाटातील व घरातील वस्तू याची शोधाशोध करून ते अस्ताव्यस्त फेकले आहेत. हे चोरटे अनेक ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्हीत निदर्शनास आले.
यामध्ये आणखी २ ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. चोरट्यांच्या हातात कुऱ्हाड व कटावणी दिसून येत असून त्यांनी अनेक ठिकाणी बिनधास्तपणे घरांची पाहणी केली आहे. ही बाब रविवारी सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस पाटील यांना कळविण्यात आले. त्यानंतर व रविवारी सकाळी दहा वाजता पोलीस आणि तपासणी करता श्वान पथक व फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपास सुरू केला. मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी या चोरीबाबत तपासासाठी २ पथके तैनात करणार असल्याचे सांगितले.