संग्रहित फोटो
पुणे : बावधन परिसरातील एक ज्येष्ठ महिलेने पीएमटी तसेच रिक्षा प्रवास सुरू केल्यानंतर या प्रवासात त्यांच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने तब्बल ११ लाखांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुपारी साडे बारा ते अडीच या कालावधीत त्या प्रवासात होत्या. याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार या बावधन परिसरात राहण्यास आहेत. त्या काही कामानिमित्त मंगळवारी दुपारी पुण्यात येत होत्या. त्यांना बावधनवरून बिबवेवाडी भागात जायचे होते. त्या प्रथम सुर्यमुखी दत्तमंदिराच्या पाठिमागे असणाऱ्या परिसरातून पीएमपीने पुण्यात आल्या. नंतर त्यांनी बिबवेवाडीत जाण्यासाठी रिक्षाने प्रवास केला. यादरम्यान त्यांच्याकडे पिशवीत ठेवलेले ११ लाख रुपयांचे दागिने होते. या रिक्षा व पीएमटी प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पिशवीतून दागिने चोरून नेले. हा प्रकार त्यांना बिबवेवाडीत गेल्यानंतर लक्षात आला. नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.
पॅन्टच्या खिशातून ६ हजारांची रोकड चोरली
पुणे शहरात सोनसाखळी, घरफोडी, वाहन चोरीसोबतच भुरट्या चोरट्यांनीही धुमाकूळ घातला असून, पुणे रेल्वे स्थानक परिसरात गर्दीतून एका व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशातून ६ हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात ४४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार मिराभाईंदर येथून पुण्यात काही कामानिमित्त मंगळवारी सायंकाळी आले होते. तेव्हा ही घटना घडली असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
पोलीस चौकीजवळच 9 दुकाने फोडली
पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असतानाच आता थेट चोरट्यांनी पोलिस चौकीपासून अवघ्या पन्नास फुटावरील तब्बल ९ दुकाने एकाच रात्रीत फोडली आहेत. यामधील ८ दुकानातून चोरट्यांनी रोकड आणि इतर साहित्य असा ४ लाख १ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे फुरसूंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
पुणे शहरभर प्रमाण वाढले
पुणे शहरात घरफोडीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी बंद फ्लॅट चोरट्यांकडून टार्गेट केले जात आहेत. अशात चोरट्यांनी दुकांने फोडून चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. तसेच दारु विक्रीची दुकाने फोडून चोरट्यांनी रोकड आणि मद्याच्या बाटल्या चोरी केल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. तर चोरट्यांनी पोलिस चौकीपासून जवळ असलेली दुकाने फोडल्याने, चोरट्यांना पोलिसांचा तरी धाक आहे की नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.