महिलेचे झोपेत दागिने हिसकाविण्याचा प्रयत्न (संग्रहित फोटो)
शिरोली : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता हातकणंगले तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वडगाव (तालुका हातकणंगले) येथील दीपक सर्जेराव थोरवत यांच्या कुटुंबीयांना स्प्रे मारून बेशुद्ध करुन घरामधील काही रोख रक्कम व दागिने अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सर्जेराव थोरवत यांचे मौजे वडगाव गावाच्या उत्तर दिशेला नागपूर – रत्नागिरी महामार्गलगत घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाकरिता त्यांचे संपूर्ण कुटुंब एका खोलीत राहत आहेत. हे राहते ठिकाण गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर व निर्जनस्थळ आहे. याचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी अज्ञात चोरट्यानी शनिवार मध्यरात्री प्रयत्न केला. या चोरट्याने दीपक थोरवत त्यांची पत्नी व दारात बांधलेले श्वानाच्या तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध केले होते व त्यानंतर त्यांनी घरातील धान्याचे डबे बाहेर आणून विस्कटले. यामध्ये महिलेचे चांदीचे पैंजण, दीपक थोरवत यांचे सोन्याचे ब्रासलेट व त्यांच्या पाकिटामधील रोख रक्कम चार हजार रुपये तसेच पती-पत्नीचे मोबाईल हँडसेट या अज्ञात चोरट्यानी लंपास केले आहेत.
पहाटे चार वाजता दीपक यांचा मुलगा लघुशंखेसाठी उठला होता. त्याने वडिलांना जागे केले. यावेळी दीपक थोरवत यांना आपल्या चेहऱ्यावर काहीतरी मारले असल्याची जाणीव झाली व ते धुंदीत असल्याचे त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आले. त्याने वीस फुटाच्या अंतरावर झोपलेल्या कुटुंबातील दीपक यांच्या भावाला जागे केले व त्यांनी दीपक थोरवत यांच्याबरोबर चर्चा केली असता चोरीचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना बेशुद्ध केल्याचे समजले.
या घटनेची माहिती शनिवारी सकाळी शिरोली पोलीस ठाण्याला कळविण्यात आली. त्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुनील गायकवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. घटना घडलेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही कॅमेरे कुठेही नसल्यामुळे प्रथमदर्शनी पोलीसांना तपासासाठी काहीही सुगावा लागलेला नाही. या घटनेमुळे मौजे वडगाव गावात अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.