 
        
        संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून संतापजनक घटना उघडकीस येत असतात. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अत्याचाराच्या घटनांना पोलिसांनी आळा घालण्याची गरज आहे. अशातच आता पुण्यात एक संतापजक घटना घडली आहे. उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर तिला वडीलांना मारहाण करण्याची व भावाला उचलून नेण्याची धमकीही देण्यात आली आहे.
याप्रकरणी एकावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदाशिव गावडे (मु. पो. सोनारवाडी, तालुका चंदगड जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने उत्तमनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. हा प्रकार १२ सप्टेंबर २०२५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सदाशिव याने पिडीत मुलीच्या मोबाईलवर कॉल करून व व्हॉट्सॲप मॅसेज केले. तिला तू आज मला भेटली नाहीस तर मी तुझ्या भावाला उचलून घेऊन जाईन तसेच तुझ्या वडीलांना मारीन अशी धमकी दिली. तसेच फोनवर मॅसेज केला की, तुझ्याकडे दोन ऑप्शन असून त्यापैकी एक म्हणजे तु मला साथ दे, नाहीतर नाही बोल, काय करायचे ते करतो दुसरा ऑप्शन मध्ये त्याने तिला शरीर सुखाची मागणी केली. तसेच तिला तुझी वाट लावीन अशी धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
भिगवणमध्ये महिलेवर अत्याचार
भिगवण परिसरातून पुण्याकडे जाण्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या महिलेला दुचाकीवर बसवून तिला झाडीत नेहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीचे रेखाचित्र तयार करून त्याद्वारे आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडित महिला भिगवण येथील हायवे लगत पुण्याकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभी होती. तेव्हा आरोपी तिथे आला. त्याने तिला “लिफ्ट देतो” असा बहाणा करत आपल्या दुचाकीवर बसवले. काही अंतर गेल्यानंतर आरोपीने माळद गाव परिसरातील रेल्वे पुलाजवळ गाडी थांबवून झाडीत अत्याचार केला. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासातून पोलिसांनी जाक्या चव्हाण याला लिंगाळी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद महांगडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.






