संग्रहित फोटो
पुणे : वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती ‘डायल ११२’ वर प्राप्त झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी वेळेत न पोहोचता पोलिसी जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील दोन बीट मार्शल पोलिस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. मुकुंद जयराम शिंदे आणि विजय हरिभाऊ पोटे अशी निलंबीत केलेल्या पोलिस कर्मचार्यांची नावे आहेत. दोघेही हडपसर पोलिस ठाणे हद्दीतील हडपसर कॉप्स २४ बीट मार्शल, गुन्हे शाखा, पुणे शहर येथे कार्यरत होते.
शनिवारी (दि. २५) रात्री साडेअकरा वाजता ‘डायल ११२’ वरून एस. के. रेसिडेन्सी हॉटेल, १५ नंबर चौक, हडपसर येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार मिळाली होती. त्यावेळी दोन्ही शिपाई रात्रपाळीवर कर्तव्यावर होते. मात्र, कॉल आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपासणी केली नाही. संबंधित कॉलचे गांभीर्य ओळखून आवश्यक ती कारवाई न केल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे आदेशात नमूद आहे.
तसेच, दोन्ही शिपायांनी कॉलची पुर्तता केली नसून, वरिष्ठ अधिकार्यांनाही घटनेबाबत कळविले नाही. कर्मचार्यांच्या या निष्काळजीपणाला ‘अत्यंत गंभीर व खेदजनक’ ठरवून त्यांच्या वर्तनामुळे पोलिस दलाच्या शिस्तीला बाधा निर्माण झाली असून त्यांचे आचरण ‘बेजबाबदार, बेफिकीर असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यानूसार या गैरवर्तनाबद्दल दोन्ही पोलिस कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
शिक्रापुरातील लॉजवरही वेश्याव्यसाय
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आहे. तिन महिलांसह एका लॉज चालकाला ताब्यात घेतले असून, राम साकोरे, विजय हेडगे व गणेश दिलीप पौळ या तिघांवर गुन्हे दाखल ककेले आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात असलेल्या लॉजवर बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यांनतर पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, रोहिदास पारखे, विकास पाटील, योगेश आव्हाड, महिला पोलीस शिपाई रुपाली निंभोरे यांनी सदर वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला.






