संग्रहित फोटो
पुणे : वडगाव बुद्रुक परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दीपाली प्रसाद गुरव (वय ३४, रा. सद्गुरुकृपा बिल्डींग, रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरव यांचे वडील आजारी आहेत. त्यांना डेक्कन जिमखाना भागातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. सोमवारी (२३ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास त्या फ्लॅट बंद करुन रुग्णालयात गेल्या होत्या. रुग्णालयातून त्या सायंकाळी सहाच्या सुमारास घरी आल्या. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. चोरट्यानी कपाट उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गुरव यांनी रात्री पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. सातत्याने विविध भागात फिरून चोरटे बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेत असल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढला जात आहे. परंतु, या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसत आहे. शहर तसेच उपनगरातील सोसायट्यातील बंद फ्लॅट टार्गेट केले जात आहेत. सुरक्षा रक्षक नसलेल्या तसेच सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निरीक्षण आहे.