सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे शहरात गर्दीत रोकड तसेच पादचारी व वाहन चालकांना लुटणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला आहे. बिनदक्त चोरटे चोऱ्या करत असताना दिसत आहेत. चोरट्यांचा माग काढत असताना देखील त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. शहरात वेगवेगळ्या चार घटना घडल्या असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात ७० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या कर्वेगनरमधील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन त्या पायी चालत वापस घरी निघाल्या होत्या. तेव्हा सकाळी साडे आकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत गळ्यातील ४० हजारांची रोकड चोरून नेली आहे.
दुसरी घटना भीमथडी जत्रेत घडली असून, स्टॉलधारक व्यावसायिक महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ७० हजारांची रोकड व पेनड्राईव्ह चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. सिंचनगर भागातील मैदानावर भीमथडी जत्रेचे आयोजन केलेले आहे. तक्रारदार कोथरूड भागातील आहेत. त्यांनी भीमथडी जत्रेत मेश्तो नावाने कपडे विक्रीचा स्टॉल सुरू केला आहे. शुक्रवारी सायंकाळी स्टॉलच्या भागात गर्दीतून चोरट्यांनी महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधली. ७० हजारांची रोकड, पेनड्राईव्ह असलेली पिशवी चोरुन चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करत आहेत.
विवाह समारंभात महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरले
विवाह समारंभातून ज्येष्ठ महिलेचे दीड लाखांचे दागिने ठेवलेली पिशवी चोरुन नेल्याची घटना नगर रस्ता भागातील एका मंगल कार्यालयात घडली. याबाबत ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारादार महिला चंदननगर भागात राहायला आहेत. त्यांच्या नात्यातील एकाचा विवाह गेल्या महिन्यात होत्या. फुलगाव येथील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ महिलेने दीड लाखांचे दागिने असलेली पिशवी मंगल कार्यालयातील खोलीत ठेवली होती. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने दागिने ठेवलेली पिशवी चोरुन नेली. विवाह समारंभ पार पडल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी तपास करत आहेत.
हडपसरमध्ये पादचारी तरुणाचा मोबाइल चोरीला
पादचारी तरुणाचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. याबाबत एका ३७ वर्षीय तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण शुक्रवारी (२० डिसेंबर) दुपारी सव्वाचारच्या सुमारास हडपसर भागातील भगीरथीनगर भागातून निघाला होता. यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या खिशातील मोबाइल चोरुन नेला. तरुणाने आरडाओराड केला. चोरटा भरधाव वेगात पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत.