संग्रहित फोटो
सीईटी कक्षाकडून १७ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यापैकी १५ परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उमेदवार, परीक्षा कर्मचारी किंवा संस्थांकडून कोणताही गैरव्यवहार, गैरवर्तन किंवा अनुचित मार्गांचा वापर झाल्यास कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी गैरप्रकारांचे स्वरूप लक्षात घेऊन शिक्षा आणि दंड निश्चित करणारी सुधारित नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान बोलणे, संकेत देणे, कॉपी करणे, नोट्स किंवा लिखित साहित्य वापरणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रश्न किंवा उत्तरे पाठविणे, तोतयागिरी करणे किंवा सामूहिक नक्कल करणे अशा प्रकारांना गंभीर गैरप्रकार मानण्यात आले आहे. अशा प्रकरणांत चालू शैक्षणिक वर्षातील सीईटीसह इतर परीक्षांसाठीची उमेदवारी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
एआय आन् डिजिटल साधनांवर बंदी
नवीन नियमावलीनुसार परीक्षेदरम्यान स्मार्टफोन, मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ उपकरणे, इअरफोन, कॅल्क्युलेटर (जिथे प्रतिबंधित असेल) यांसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट बाळगणे किंवा वापरणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधने, लपविलेले कॅमेरे, स्क्रीन मिररिंग, रिमोट ॲक्सेस सॉफ्टवेअर किंवा अन्य डिजिटल साधनांचा वापर केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करून आयटी कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिस अन् महानगरपालिका प्रशासनाचा मोठा निर्णय; येत्या 8 दिवसात…
गैरप्रकार झाल्यास केंद्राची मान्यता कायमची रद्द
परीक्षा केंद्रांसाठीही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. केंद्रांवर सीसीटीव्ही व्यवस्था, बायोमेट्रिक पडताळणी आणि कडक देखरेख बंधनकारक करण्यात आली आहे. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता तात्पुरती किंवा कायमची रद्द करण्याचा अधिकार सीईटी कक्षाला राहणार आहे.






