पुण्यात चोरीच्या घटना (फोटो- istockphoto)
पुणे: शहरात बंद फ्लॅट फोडणारे आणि बसप्रवासात महिलांकडील किंमती ऐवज चोरणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, खराडीत बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. तर, कर्वेनगर आणि शनिपार चौकातून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यां महिलांकडील सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात २९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार या खराडीतील लेन नंबर ८ मध्ये राहण्यास आहेत. दरम्यान, त्या दोन दिवसांपुर्वी (दि. १७ मार्च) सकाळी साडे दहाच्या सुमारास घराला कुलूप लावून गेल्या होत्या. परत रात्री आठच्या सुमारास आल्या असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी त्यांच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, लोखंडी कपाटातील रोकड व दागिने असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक राहुल कोळपे करत आहेत.
कर्वे रस्त्यावर बसमध्ये चोरी
कर्वे रस्त्यावरून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेकडील १ लाख २५ हजार रुपयांची सोन्याची पाटली चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली असून, याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात ६८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. त्यासोबतच बालाजीनगर येथून शनिपार चौकात येण्यासाठी पीएमपीने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी दागिने व रोकड असा १ लाख १ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत २९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
वडगावात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट, महिलांमध्ये भीतीचे वातावरण; पोलिसांकडून तक्रार दाखल
वडगावात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट
वडगाव मावळ पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये धूमस्टाईल दुचाकीवरून भरधाव जात रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उपद्रव पुन्हा वाढला आहे. शहरात सलग दोन दिवस सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार घडल्याने पायी फिरणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वडगाव शहरात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी काही अज्ञात चोरटे दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील दागिने ओढण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा या घटना एकाच आठवड्यात दोन ते तीन वेळा या घडल्या आहेत. तसेच चोरटे चपळाईने पळ काढत आहेत. वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठ मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानेही चोरटे खुलेआम दागिने हिसकवण्याचे प्रयत्न करत आहे.