खळबळजनक ! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर दोघांकडून गोळीबार; पहाटेच्या सुमारास हल्लेखोर आले अन्... (फोटो- istockphoto)
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच पंचवटी परिसरात टोळीयुद्धातून नागचौक आणि हिरावाडी परिसरात गोळीबार झाल्याच्या घटनेने नागरिक दहशतीखाली आहेत. असे असतानाच म्हसरूळ परिसरात एका व्यावसायिकाच्या घरावर पहाटे दोघा संशियतांकडून गोळीबार करण्यात आला.
पंचवटी परिसरात प्राणघातक हल्ले, खून, जबरी लूट, भाविकांची दिवसाढवळ्या लुटीचे प्रकार सुरू असताना टोळीयुद्धानेही डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच म्हसरूळ परिसरात कलानगर लेन नंबर पाचमध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक साई अंगद उमरवाल (वय ६९) हे आपली मुले संतोष, मनीष उर्फ मोतीलाल साई उमरवाल, सुना व नातवंडे यांच्यासोबत एकत्र राहतात. रविवारी (दि. ५) पहाटे अज्ञात दोघा संशयितांनी उमरवाल यांच्या घरासमोर उभी असलेल्या (एमएच १५ जीआर २९००) कारच्या काचा फोडून नुकसान केले होते.
दरम्यान, या तोडफोडीबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत आहेत. त्यातच पहाटे ४.३७ वाजता अज्ञात दोघांनी येत साई उमरवाल यांच्या घराच्या दिशेने गोळीबार करत ते दुचाकीवरून फरार झाले. गोळीबार करत असल्याची घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
उमरवाल यांचा मुलगाही जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात
साई उमरवाल यांचा मुलगा मनीष उर्फ मोतीलाल साई उमरवाल हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे एखाद्या व्यवहारातून त्यांचे कोणाशी काही बिनसले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच, मनीष याला सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यातून त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला का, या दिशेने देखील पोलीस शोध घेत आहेत.
तुळजापुरातही गोळीबाराची घटना
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी तुळजापूर येथे अज्ञातांकडून बारसमोर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटात हाणामारी झाली. त्यांनतर या हाणामारीत गोळीबाराची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना शनिवारी (दि. 07) सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ पथकही पोहोचले होते. पंचनामा करून परिसराची पाहणी करण्यात आली आहे. पोलीस गोळीबार का करण्यात आला? याचा तपास सुरु आहे.
हेदेखील वाचा : मोठी बातमी! हॉस्टेलमध्ये मृतदेहांचा खच! अंदाधुंद गोळीबारात 11 ठार तर…; South Africa हादरली






