हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्... (संग्रहित फोटो)
नाशिक : नाशिकरोड परिसरातील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. वाढदिवसाचे जेवण करण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील मुलीचे विनापरवाना फोटो काढून त्यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित स्वप्नील धात्रक, यश गायखे आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मंगेश खळसे हे आपल्या कुटुंबासह नाशिकरोड येथून जवळच असलेल्या शिंदेगाव टोलनाक्याजवळील हॉटेल वृंदावन येथे बहिणीच्या नातवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. यावेळी संशयित स्वप्नील धात्रक याने फिर्यादीच्या मुलीच्या दिशेने मोबाईलचा कॅमेरा करून तिचे विनापरवाना फोटो काढले. या कृत्याबाबत कुटुंबाने जाब विचारला असता, संशयितांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हेदेखील : Bihar Crime: चार मित्रांनी एकत्र घेतलं उचललं टोकाचं पाऊल; एकाच कंपनीत करायचे नोकरी; काय घडलं नेमकं ?
तसेच संशयित स्वप्नील व यश गायखे यांनी फिर्यादीच्या पत्नीचा हात धरून तिला बळजबरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. या वादादरम्यान संशयितांनी फिर्यादीच्या कुटुंबाला त्यांच्या जातीवरून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपमानित केले. ‘तुम्ही खालच्या जातीचे आहात’ असे म्हणत जातिवाचक टिप्पणी करून सार्वजनिक ठिकाणी कुटुंबाचा मानसिक छळ केला. या गंभीर प्रकारानंतर पीडित कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांनी तातडीने गुन्हा केला दाखल
सदर घटनेची दखल घेत उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ व त्यांचे कर्मचारी करत असून, संबंधित घटनेतील संशयित आरोपींचा कसून शोध सुरू आहे. या प्रकारामुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रवृत्तींविरुद्ध कडक पावले उचलली जातील, असे पोलिसांनी आश्वस्त केले आहे.
हेदेखील : Madhyapradesh Crime: संतापजनक! विवाहित महिला व अल्पवयीन बहिणीवर मावसभाऊ-मित्राकडून अत्याचार






