संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.
शहरात ड्रग्ज पेडलरांची संख्या मोठी असून, त्यांच्याकडून किरकोळ स्वरूपात गांजा, एमडी तसेच इतर ड्रग्ज छुप्या पद्धतीने पुरविले जात असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. पोलिसांकडून या पेडलरांची झाडाझडती झाली असली तरी शहरात मात्र ड्रग्जचा पुरवठा सुरूचं आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेची पथके हद्दीत पेट्रोलिंग करत आहेत. यादरम्यान, युनिट एकच्या पथकातील एसपीटी मार्शलवरील पोलीस अंमलदार सुजय रिसबुड यांना माहिती मिळाली की, शुक्रवार पेठेत दोन तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यानूसार, पथकाने परिसरात सापळा रचून अटक केली.
झडतीत आरोपींकडून ८२० ग्रॅम गांजा मिळून आला. त्यांनी हा गांजा कोठून आणला तसेच तो नेमका कोणाला विक्री करण्यास आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद करत आहेत.
हे सुद्धा वाचा : नवले पूल परिसरात वेश्याव्यवसाय; ‘त्या’ महिलांवर पोलिसांची कारवाई
तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी
गांजासारख्या ड्रग्जच्या तरुण पिढी आहारी जात आहे. त्यामुळे त्यांचे प्रचंड शारीरिक आणि मानसिक नुकसान होत आहे. अमली पदार्थाचे वाढते सेवन ही समाजातील मोठी समस्या आहे. या समस्येला नष्ट करण्यासाठी या अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करणे महत्वाचे आहे. त्यांच्यावर कारवाई केली तरच अमली पदार्थाची साखळी नष्ट करता येते. गाजांविक्री टोळी ही अतंत्य छुप्या पध्दतीने कार्यरत असते. त्यांना पोलिसांना अत्यंत शिताफीने पकडावे लागते. गेल्या काही दिवसाखाली गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण येथे करण्यात आली. आशिष शिवपूजन पांडे (वय २८, रा. भुजबळ चौक, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह साईसिंग (रा. शहादा, जि. नंदुरबार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.