अज्ञात चोरट्यांची वृद्ध दाम्पत्यास मारहाण; 6 तोळे सोन्याचे दागिनेही केले लंपास
पारगाव शिंगवे : अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल व जाळी उचकटून घरात प्रवेश केला. यामध्ये झोपलेल्या वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण केली. याशिवाय, महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा १ लाख ८६ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरट्याने लंपास केला. ही घटना (दि.२१) रात्री एक वाजण्याच्या सुमारास काठापूरच्या गणेश वस्ती (ता.आंबेगाव) या ठिकाणी घडली.
कमल ज्ञानेश्वर जाधव (वय ७५, रा. काठापूर) व पती ज्ञानेश्वर जाधव (वय ८३) असे मारहाण झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नावे आहे. या घटनेची फिर्याद कमल ज्ञानेश्वर जाधव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काठापुरच्या गणेश वस्तीमध्ये कमल ज्ञानेश्वर जाधव व पती ज्ञानेश्वर जाधव रात्री जेवण करून घरामध्ये झोपले होते. रात्री एक वाजता सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी घराच्या पाठीमागील लोखंडी ग्रिल व जाळी उचकटून घरात प्रवेश केला.
दरम्यान, यावेळी वृद्ध दाम्पत्य झोपलेले होते. अज्ञात तीन चोरट्यांनी अंगावरील पांघरूणे काढून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना विरोध करत असताना कमल जाधव यांच्या डाव्या पायावर जोरात मारहाण करण्यात आली. त्यांच्या पायाला मोठी जखमी झालेली आहे.
सोन्याचे दागिनेही काढून घेतले
वृद्ध महिलेचे साडेतीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र व दोन सोन्याच्या वाट्या तसेच दीड तोळ्याचे सोन्याचे मणी, डोरले व भोरमाळ असे एकूण सहा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी काढून घेतले. तसेच पती ज्ञानेश्वर जाधव यांना जबर मारहाण करण्यात आली. डाव्या पायाला मोठी दुखापत झाली.
चोरीच्या घटनेची पोलिसांना दिली माहिती अन्…
वृद्ध महिलेने चुलत दीर नवनाथ जाधव यांना फोन केला. नवनाथ व इतर गावातील लोकांनी या चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जखमी दाम्पत्याला ॲम्बुलन्सने ओम हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणण्यात आले. दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. पोलिसांचे ठसे पथक व श्वन पथक दाखल झाले होते.