पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी वैष्णवीच्या सासरच्या पाच जणांना अटक केली आहे. यात वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू, नवरा, दीर सुशील हगवणे आणि नणंद यांचा समावेश आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाने राजकारणावरही परिणाम झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबत पक्षाकडून अधिकृत नोटीसही काढण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, तर सुशील हगवणे युवक काँग्रेसमधील पदाधिकारी होता.दरम्यान, सुशील हगवणेची एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या लेक आणि सुनेबाबत काही विधान केले असून, त्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वैष्णवीचे दीर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना सुशील हगवणे यांनी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. बारामतीत नणंद विरूद्ध भावजय अशी लढत होती. त्यावेळी सुशील हगवणे यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीली होती. ‘यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुया….सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया…. एक मत सुनेसाठी,’ अशी पोस्ट सुशील हगवणेने केली होती.
दुर्दैवी ! विजेच्या तीव्र धक्क्याने 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; कूलरमधून झटका लागला अन्…
पण सुनेसाठी मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या सुशील हगवणे यांच्या कुटुंबियांनीच घरातील दोन्ही सुनांचा छळ केला. हुंड्यासाठी दोघींनाही प्रचंड मानसिक आणि शारिरीक त्रासही दिला. त्याच त्रासातून एका सुनेने ( मयुरी जगताप-हगवणे) यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. तर दुसऱ्या सुनेने ( वैष्णवी कस्पटे-हगवणे) टोकाचं पाऊल उचलत थेट आयुष्यच संपवलं. या प्रकारानंतर वर्षभरापू्र्वी सुशील हगवणेने केलेली पोस्ट आता चर्चेत आली असून त्यावरून नेटकऱ्यांनी हगवणे कुटुंबावर पुन्हा संताप व्यक्त केला आहे. सुशील हगवणे यांच्या वर्षभरापूर्वी केलेल्या त्या पोस्टच्या खाली ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण’ अशी हगवणे कुटुंबाची अवस्था असल्याच्या कमेंट नेटकऱ्यांकडून केल्या जात आहेत.
गेल्या वर्षी सुशील हगवणे यांनी ३ मे २०२४ रोजी ती पोस्ट केली होती. त्याखाली त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुनेत्रा पवार आणि रुपाली ठोंबरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. पण हगवणे कुटुंबाची पोलखोल झाल्यानंतर राज्यभरातून त्याच्या पोस्टखाली कमेंट्स करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर, अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही टीका केली आहे. या प्रकरणानंतर नागरिकांनी थेट राजकीय नेत्यांवरही हल्लाबोल केला आहे. “तुमचे कार्यकर्ते काय प्रकार करतात ते बघा. काल तुम्ही चॅनेलवरील चर्चेत म्हणालात की, ‘मला माहीत नव्हतं की ते आमच्या पक्षात आहेत’. मग हे काय आहे?” असे सवाल नागरिकांकडून नेते ठोंबरेंना विचारण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, पिकांचेही मोठे नुकसान; हवामान विभागाने म्हटले
सुशील हगवणेच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्याने केलेल्या पोस्टमधील विधानांवर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. “निर्लज्ज राजकारणी!”, “ह्यांनाही सहआरोपी करा”, “सुनेबद्दल कोण बोलतंय बघा”, “राजकारणात माणसं किती खोटं बोलतात बघा”, “स्वतःच्या घरातील सुनांना नीट सांभाळता येत नाही आणि लोकांना ज्ञान शिकवायला निघालात?”, “तू वागलास काय आणि इथे बोलतोस काय?”, “सुनेचा मान कसा ठेवायचा ते शिकावं आधी” अशा स्वरूपाच्या संतप्त कमेंट्स सुशील हगवणेच्या पोस्टखाली नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केल्या आहेत.