वैष्णवी हगवणे प्रकरणात विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक दावे
Vijay Wadettiwar Meets Kaspate Family: मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणेने आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत ती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, नणंद करिष्मा, दीर सुशील या सर्वांना अटक करण्यात आली आहे. तरीही या प्रकरणातील आणखी एक आरोपी निलेश चव्हाण हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. हे सर्व सुरू असताना वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज अनिल कस्पटे यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले .
कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर भेटीनंतर विजय वडेट्टीवार यांनी वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी ट्विट करत पोस्ट शेअर केली आहे. “पैशासाठी होणाऱ्या सासरच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या स्व. वैष्णवी हगवने हिचे आई- वडील आणि कस्पटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. वैष्णवीच्या आई वडिलांच्या वेदना आज शब्दांत मांडता येण्यासारख्या नाहीत.
वैष्णवीच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरून हे स्पष्ट होते की, ही आत्महत्या नसून सरळसरळ हत्या आहे. इतकी गंभीर घटना घडून सुद्धा पोलीस कारवाई संथ गतीने सुरू आहे, हे अत्यंत दुःखद आहे. राज्य महिला आयोगाने स्वतःहून कारवाईस पुढाकार न घेणे हे महाराष्ट्रासाठी खरोखर लज्जास्पद आहे. सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष देऊन वैष्णवी, तिच्या ९ महिन्याच्या बाळाला आणि कस्पटे कुटुंबाला न्याय द्यावा ही सरकारकडे मागणी आहे.” असही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आरोपी असलेला सासरा राजेंद्र हगवणे याला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या प्रकरणात आरोपींवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. नियमांचा अभ्यास करून, गरज भासल्यास आरोपींवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचाही विचार केला जाईल.”
आतड्यात सडलीये घाण पण जीभ दिसते सफेद, काय आहे कारण; दुर्लक्ष करणे ठरेल चुकीचे
शशांक हगवणेचा सहकारी आणि बाळासाठी आलेल्या वैष्णवीच्या नातेवाइकांना धमकी दिल्याप्रकरणी निलेश चव्हाणविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. निलेश चव्हाण देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी निलेशच्या निवासस्थानावर छापा टाकून तेथून एक लॅपटॉप जप्त केला आहे.
निलेश चव्हाणवर स्वतःच्या पत्नीचे तसेच इतर महिलांचे अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा आरोप आहे. तसेच बंदुकीचा धाक दाखवत त्याने वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचेही समोर आले आहे. आता पुणे पोलिसांकडून त्याला अटक कधी केली जाते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.