चालकाची चाकूने भोसकून हत्या (File Photo : Crime)
Satara Crime News: साताऱा येथील मंगळवार पेठेतील रवी रिजन्सी येथे राहणाऱ्या अंजली राजेंद्र शिंदे (वय २९) यांचा संशयास्पद मृत्यू व पतीकडून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी पती राजेंद्र भानुदास शिंदे (वय ३२) याला ताब्यात घेतले आहे. तर खून झालेल्या पत्नीचे नाव अंजली राजेंद्र शिंदे (वय २९, रा. मंगळवार पेठ) असे आहे.
भांडणादरम्यान मृत महिलेच्या भावाशी झालेल्या झटापटीत संशयित आरोपी जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. पुढील तपास सुरू आहे.
राजेंद्र शिंदे हा सेंट्रींग कामगार असून त्याला दारूचे व्यसन होते. तो पत्नी अंजली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. याच कारणावरून १९ जून रोजी नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झाले होते. अंजली शिंदे यांनी या भांडणाची माहिती आपल्या माहेरच्या लोकांना दिली होती..
मात्र, दुसऱ्याच दिवशी २० जून रोजी सकाळी अंजली यांचा मृतदेह घरातील पलंगाच्या खाली कपड्याच्या गाठोड्यात झाकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मयत अंजली यांचे बंधू श्रेयस पाटील हे तिथे धावून आले असता त्यांची आणि आरोपी राजेंद्र यांच्यात धक्काबुक्की झाली. यामध्ये आरोपी जखमी झाला असून, त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकलूजच्या गणेशगावमध्ये शेतकऱ्याची निर्घृण हत्या; डोकं, तोंडासह पायावरही धारदार हत्याराने केले वार
या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, विसेरा राखून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिर्के करीत आहेत.






