भाजप माजी पदाधिकाऱ्यावर MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल; घर देण्याच्या आमिषाने केली होती फसवणूक
सावन वैश्य, नवी मुंबई: घर देण्याच्या बहाण्याने अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या माजी पदाधिकाऱ्याला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. अखेर मोक्कांतर्गत (MCOCA) अटक केली आहे. अटकेत आलेल्या आरोपीचे नाव रणजित नाईक असून, तो भाजप युवा मोर्चाचा माजी महामंत्री आहे.
रणजित नाईक याच्यावर मागील वर्षभरात दोन वेगवेगळ्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. त्याने घर खरेदीसाठी लोकांकडून लाखो रुपये उकळले होते. मात्र त्यानंतर त्यांना घर न देता वेळकाढूपणा सुरू केला. त्यानुसार नागरिकांनी नेरुळ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला नोटीस देखील बजावली होती. संबंधित गुन्हा जामीनपात्र असल्याने पोलिसांनी बजावलेल्या नोटीसांनाही तो प्रतिसाद देत नव्हता.
या प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रणजित नाईकविरुद्ध फसवणुकीसोबतच संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नेरूळ पोलिस अधिक तपास करत असून, आणखी काही नागरिक फसवणुकीचे बळी ठरले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बातमी अपडेट होत आहे…